दिल्ली ( जनसूर्या मीडिया )
शनिवारी (९ मार्च) आम आदमी पक्षाने दिल्लीत महिलांचा सत्कार करत लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला. यंदाच्या अर्थसंकल्पात महिला सन्मान योजनेची घोषणा केल्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी टाऊनहॉल कार्यक्रमात दिल्लीतील महिला मतदारांना संबोधित केले. या वर्षीच्या अर्थसंकल्पात अरविंद केजरीवाल सरकारने मुख्यमंत्री सन्मान योजनेअंतर्गत दिल्लीतील महिला मतदारांना दरमहा १००० रुपये देण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत महिला मतदारांनी आम आदमी पक्षाला मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले.
अरविंद केजरीवालांनी महिला मतदारांना काय केलं आवाहन?
मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले, “या अर्थसंकल्पात आम्ही महिला सक्षमीकरणासाठी मोठी योजना जाहीर केली आहे. आतापर्यंत सक्षमीकरणाच्या नावाखाली फसवणूक सुरू होती. आतापर्यंत ते पक्षातील एका महिलेचे कौतुक करायचे आणि महिलांचे सक्षमीकरण होत असल्याचे सांगत.” “आता मी दर महिन्याला प्रत्येक महिलेच्या पर्समध्ये हजार रुपये ठेवीन. रिकाम्या पर्समुळे सशक्तीकरण होत नाही. एका कुटुंबात तीन महिला असल्यास तिघांनाही लाभ मिळेल. ही योजना जाहीर झाल्यापासून आता दिल्लीतील सातही जागा केजरीवालांच्याच असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे”, असे केजरीवाल म्हणाले.
“तुमचा नवरा मोदी-मोदी करत असेल…’, केजरीवाल काय म्हणाले?
दिल्लीचे मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘पण याचा विचार करून घरी बसू नका, ते अतिशय बदमाश आहेत. कुणास ठाऊक, ईव्हीएममध्ये काहीतरी गडबड करून ठेवलेली असेल, पण जर १० टक्के मते इकडे-तिकडे गेली तर २० टक्के जास्त काम करावे लागेल.”
“आता आपल्या पती, भाऊ, वडील आणि परिसरातील इतर लोकांना आपल्या फायद्यासाठी काम करणाऱ्या व्यक्तीला मतदान करण्यासाठी पटवून देण्याची जबाबदारी आपली आहे. जर तुमचा नवरा मोदी-मोदी बोलत असेल, तर त्याला रात्रीचे जेवण देऊ नका आणि तुमची शपथ द्या. त्यामुळे प्रत्येक पतीला आपल्या पत्नीचे म्हणणे ऐकावे लागले”, असे विधान केजरीवाल यांनी केलं. ते म्हणाले की, “१८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व महिलांना १,००० रुपये देण्याची आम आदमी पार्टीची योजना त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र करेल. एकाच कुटुंबात अनेक पात्र महिला असतील तर त्या सर्वांना योजनेचा लाभ घेता येईल.”
विरोधकांवर निशाणा साधत केजरीवाल म्हणाले, “ते (भाजप) म्हणतात की या योजनेमुळे महिलांचा नाश होईल. दिल्लीतील प्रत्येक महिलेला एक हजार रुपये देऊन केजरीवाल पैशाची उधळपट्टी करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मी त्यांना विचारतो की, तुम्ही अनेकांची मोठी कर्जे माफ केलीत, ते चुकीचे नव्हते का?”, असा सवाल केजरीवाल यांनी भाजपला केला.
Post Views: 115
Add Comment