कोलकत्ता ( जनसूर्या मीडिया )
लिव्ह-इन रिलेशनशिप प्रकरणांच्या बाबतीत बऱ्याच उलट सुलट घटना मागील काही महिन्यांमध्ये घडल्या आहेत. लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या महिला या मोठ्या प्रमाणात बळी ठरल्या असून त्यांचा निर्दयीपणे खून केल्याच्या अनेक घडल्या आहेत. पण कोलकत्तामध्ये एक वेगळेच प्रकरण घडले असून महिलेनेच आपल्या ३२ वर्षीय लिव्ह-इन पार्टनरची निर्घृण हत्या केली आहे.
सदर घटना कोलकातामध्ये घडली आहे. संहाती पॉल (३०) असे आरोपी महिलेचे नाव आहे. संहातीचा घटस्फोट झाला असून तिला एक मुलगा आहे. तसेच ती एक प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आहे. संहाती ही सार्थक दास (३२) या फोटोग्राफरसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाद सुरू होते. अशातच बुधवारी संहातीने टोकाचे पाऊल उचलले आणि सार्थकवर धारदार चाकूने वार करत त्याचा खून केला. सार्थकचा खून होण्यापूर्वी काही मिनिटे आधी सार्थकने ‘फॅमिली’ या कॅप्शनसह संहाती आणि तिच्या मुलासोबतचा एक फोटो शेअर केला होता.
खून केल्यानंतर संहातीने स्वत: पोलिसांना हत्या केल्याची कबुली दिली, तसा फोन तिने पोलिसांना केला. त्यानंतर पोलिसांचे एक पथक डमडम भागातील त्यांच्या घरी पोहोचले. सार्थक दास रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याच्या शरीरावर चाकूने वार केल्याच्या अनेक खुणा होत्या. पोलिसांनी त्याला जवळील रुग्णालयात दाखल केले, तेथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. संहातीने सार्थकचा खून का केला हे अद्याप पोलिसांना समजलेले नाही. संहातील खुनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.
Add Comment