अमरावती

ग्राहकांना सुसह्य वीज पुरवठा व्हावा यासाठी महावितरणचे पावसाळ्यापूर्वी च्या कामाला गती

अमरावती प्रतिनिधी :

पावसाळा काही दिवसांवर आहे, या दिवसांमध्ये वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढते. परंतु पावसाळ्यातही ग्राहकांना सुसह्य वीजपुरवठा करता यावा यासाठी महावितरणकडून मान्सूनपूर्व वीज यंत्रणा दुरुस्ती तसेच देखभाल व वीज वाहिन्यांच्या आड येणाऱ्या झाड्यांच्या फांद्या छाटण्याच्या कामाला गती देण्यात आली आहे. तरी ग्राहकांनीदेखील महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन महावितरण प्रशासनाने केले आहे.

मागील काही महिन्यांपासून अमरावतीसह संपूर्ण विदर्भात अंगाची लाहीलाही करणारे तापमान आहे. त्यातच अधून-मधून विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पडण्याच्या घटनाही या काळात मोठ्या प्रमाणात झाल्या आहेत. महावितरणच्या वीज वितरण यंत्रणेतील बहुतांश सामग्री ही उघड्यावर असल्याने वातावरणात होणाऱ्या बदलाचा प्रतिकूल परिणाम वीज वितरण यंत्रणेवर होत असतो व पर्यायाने त्याचा परिणाम ग्राहक आणि ग्राहक सेवांवर होतो. यामुळे उन्हाळा व त्यानंतर लगेच सुरू होणारा पावसाळा हा वीज ग्राहकांना सुसह्य व्हावा यासाठी महावितरण कामाला लागली आहे. वाढलेल्या झाडांच्या फांद्या तारांवर लोंबकळत असतात. या फांद्या काही ठिकाणी तारांवर घासत असतात व यामुळे विद्युत यंत्रणेची क्षती होत असते.

वीज वाहिन्यांत सैल झालेले गार्डिंग व स्पॅन घट्ट करणे, दोन खांबामध्ये झोल पडलेल्या तारा ओढून घेणे, सर्व खांब आणि त्यांचे ताण सुस्थितीत करण्याचे कामही मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आले आहे. वीज उपकेंद्रातील रोहित्रांमधील तेलाची योग्य पातळी राखणे तसेच ब्रिदरमधील सिलिका जेल पिंगट झाले असल्यास ते बदलणे, रोहित्रांचे आर्थिंग मजबूत करणे, पोल, वितरण पेट्या, फिडर पिलर्स, मिनी फिडर पिलर्स या सर्वांचे अर्थिंग सुस्थितीत करण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे. याशिवाय वीज खांब आणि तारांचे मजबुतीकरण, विजेचे खांब, तारा बदलणे किंवा झोल काढणे, जुन्या फिडर पिलरमध्ये इन्शुलेशन स्प्रे मारणे तसेच पावसाचे पाणी साचणाऱ्या परिसरातील फिडर पिलरची उंची वाढवणे, बॅटरी चार्जिंग, फ्यूज बदलणे अशी विविध कामे सर्वत्र मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने नागरिकांनी महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!