क्राईम

कॅफे संचालकाला मारहाण आणि वसुली प्रकरणात दोन हवालदार निलंबित

नागपूर : प्रतिनिधी

एका कॅफेच्या संचालकाला सीताबर्डी पोलीस ठाण्यात बांधून जबर मारहाण करीत पाच लाख रुपयांची मागणी केली. हे वसुलीचे प्रकरण उघडकीस येताच दोन्ही वसुलीबाज पोलीस हवालदारांना सेवेतून निलंबित करण्यात आले.
प्रवीण वाकोडे आणि समाधान कांबळे अशी निलंबित करण्यात आलेल्या वसुलीबाज हवालदारांची नावे आहेत. या घटनेमुळे पोलीस विभागाची प्रतिमा मलिन झाली असून पोलिसांवरील विश्वास नागरिकांचा कमी होत असल्याचे चित्र आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या ३१ डिसेंबरला वेस्ट हायकोर्ट रोडवर असलेल्या यश दुबे यांच्या ‘फर्जी’नावाच्या कॅफेमध्ये सायरस आणि त्याची मैत्रिणी आले होते. दोघांनी कॉफी घेतल्यानंतर कोणत्यातरी कारणावरुन दोघांत वाद झाला. दोघांमधील वाद वाढल्यानंतर सायरस याने त्या मैत्रिणीच्या कानशिलात लगावली. त्यामुळे त्या महिलेने सीताबर्डी पोलीस ठाण्यात मारहाण केल्याची तक्रार दिली. सीताबर्डी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक कविता जगताप यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला. उपनिरीक्षक कविता जगताप यांनी तपासाची ‘केस डायरी’ पोलीस ठाण्यातील आपल्या कपाटात ठेवली. मात्र, पोलीस हवालदार प्रवीण वाकोडे आणि समाधान कांबळे यांनी पोलीस उपनिरीक्षक जगताप यांच्या कपाटातील ‘केस डायरी’ चोरली आणि अधिकार नसताही तपास सुरु केला. आरोपी हॉटेलचा संचालक सायरस याला हवालदार प्रवी‌ण वाकोडे याने फोन करुन तपास करायचा असल्याचे सांगून पोलीस ठाण्यात बोलावले. सायरस यांना गुन्ह्यात वाढ करण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याला दोरीने बांधून जबर मारहाण केली. त्यानंतर गुन्ह्यातून वाचायचे असल्यास त्याला पाच लाख रुपयांची मागणी केली. घाबरलेल्या सायरस याने दोन्ही हवालदारांना पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या दोघांनी त्याला पुन्हा मारहाण केली.

हवालदारांची केली तक्रार

सायरस याला जबर मारहाण केल्यामुळे चिडून त्याने पोलीस उपायुक्त राहुल मदने यांच्याकडे तक्रार केली. या प्रकरणी चौकशी केली असता दोन्ही हवालदारांनी ‘केस डायरी’ अनधिकृतरित्या ताब्यात घेऊन तपास सुरु केल्याची माहिती समोर आली. तसेच पाच लाख रुपयांची वसुली करण्यासाठी मारहाण केल्याचेही उघडकीस आले. त्यामुळे पोलीस उपायुक्त मदने यांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्यानंतर प्रवीण वाकोडे आणि समाधान कांबळे यांना निलंबित केले. त्यांच्यार गुन्हेसुद्धा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

पाच लाखांत वाटा कुणाचा?

दोन्ही पोलीस हवालदारांनी सायरस याला पाच लाखांची मागणी केली. हे पैसे हवालदारांनी कुणासाठी मागितले होते? कुणी मागण्यासाठी प्रवृत्त केले होते का? जर पैसे मिळाले असते तर त्यामध्ये वाटा कुणाचा असता? असे अनेक प्रश्न सध्या अनुत्तरित आहेत. त्यामुळे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक कविता जगताप यांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. तसेच सीताबर्डीचे ठाणेदार चंद्रशेखर चकाटे यांना या प्रकरणात विचारणा करण्यासाठी संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!