अपघात

महामार्गावरील एसटी जळून खाक

चालक आणि वाहकाच्या सतर्कतेने सर्व प्रवासी सुखरूप

बारामती-फलटण महामार्गावर एसटी बस जळून खाक झाल्याची घटना शनिवारी (दि. ४ ) दुपारी घडली. चालक व वाहक यांच्या प्रसंगावधानाने बसमधील सर्व प्रवासी सुखरूप बाहेर पडले. इंधन (सीनजी) टाकीचा स्फोट न झाल्याने मोठी दुर्घटना टळली.
मिळालेल्या माहितीनुसार, बारामती आगारातून दुपारी २:३० वाजता कोल्हापूरला एमएच १४ बीटी ४९७१ क्रमांक असलेली एसटी बस जात होती. गाडीत ३६ प्रवासी होते. बारामती-फलटण महामार्गावरून जात असताना फलटण हद्दीतील गणेशनगर (कत्तलखाना) जवळ आली असता कसलातरी मोठा आवाज झाला. काही वेळातच बसच्या खालून धूर येऊ लागला.
चालक नाना महादेव बाबर यांनी बस थांबवून प्रवाशांना खाली उतरण्याच्या सूचना दिल्या. बस पेटल्याचे लक्षात येताच प्रवाशांनी आरडाओरडा केला. प्रवाशी बसमधून उतरत असतानाच आगीची तीव्रता वाढू लागली होती. बसमधील तीन प्रवाशांना खाली उतरण्यास अडचण निर्माण झाली होती. परंतु वाहक महादेव सकरु चव्हाण यांनी जीव धोक्यात घालून तीन प्रवाशांना बाहेर काढले. बसमधील सर्व प्रवासी खाली उतरल्यानंतर आगीने रौद्ररूप धारण केले होते.
वाहक मोहन चव्हाण यांनी अग्निशमन दल, पोलिसांशी संपर्क साधला. माहिती मिळताच फलटण नगर परिषद, बारामती एमआयडीसी येथील अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. या घटनेमुळे महामार्गावर वाहतूक ठप्प होऊन वाहनांच्या रांगा लागल्या. संपूर्ण बस विझल्यानंतर फलटण शहर पोलिसांनी वाहतूक सुरळीत चालू केली.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!