महाराष्ट्र

एसपी श्रीकांत धिवरेंचा मोठा दणका ; पोलीस अधिकाऱ्यांना भोवला निष्काळजीपणा

धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी निष्कळजीपणा करणाऱ्या चार पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. यामुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

धुळे प्रतिनिधी –

जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पुन्हा आपल्या कर्तव्य कठोरतेचे दर्शन घडविले आहे. केंद्रीय आपत्कालीन सेवेला संथ प्रतिसाद देणाऱ्या चार पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांना कंट्रोलला जमा करण्यात आले आहे. यामध्ये धुळे शहर, धुळे तालुका, निजामपूर आणि दोंडाईचा पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तर तीन पोलीस कर्मचाऱ्यांवर थेट निलंबनाची कारवाई झाली असून यामुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
केंद्राने डायल ११२ ही आपत्कालीन सेवा कार्यान्वित केली आहे. तिथे तक्रारदार किंवा संकटग्रस्त व्यक्तीने कॉल केल्यानंतर पोलीस यंत्रणा, आरोग्य यंत्रणा आदींना मदतीसाठी धावून जावे लागते. विशेष म्हणजे प्रत्येक पोलीस ठाण्यांना ११२ वरील तक्रारीस प्रतिसाद देण्यासाठी एक ठराविक वेळ निर्धारीत करण्यात आली आहे. तितक्या वेळात तक्रारदारांपर्यंत पोलिसांना पोहचावे लागते. शिवाय, तशी माहिती वरील यंत्रणेकडे सुपूर्द करावी लागते. परंतु, जिल्ह्यातील काही पोलीस ठाण्यांकडून ११२ सेवेला नीट प्रतिसाद दिला जात नसल्याचे एसपी श्रीकांत धिवरे यांच्या निदर्शनास आले.

तीन कर्मचाऱ्यांचे निलंबन

जानेवारी महिन्याच्या डायल ११२ च्या रिपोर्टनुसार धुळे जिल्हा हा सर्वात शेवटच्या नंबरवर असल्यामुळे पोलीस अधीक्षकांना ही कारवाई करावी लागली. कहर म्हणजे आजही धुळे शहर, धुळे तालुका, निजामपूर आणि दोंडाईचा पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांना वायरलेसवर ऑनलाईन येण्यास बराच उशीर झाला. त्यामुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणखी संतप्त झाले. आज वायरलेसवरच संदेश फिरवत त्यांनी वरील पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांना पुढील आदेश येईपर्यंत कंट्रोलला हजर होण्याबाबत सांगितले. तर याच प्रकरणी तीन कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची घोषणा केली. या पोलीस कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची ऑर्डर आजच निघणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

पदभार सोडून जावे लागणार पोलीस कंट्रोलला

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरेंच्या आदेशामुळे शहर पोलीस निरीक्षक धीरज महाजन, धुळे तालुका पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील, निजामपूर सहा. पोलीस निरीक्षक हनुमंतराव गायकवाड दोंडाईचा सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांना आपला पदभार सोडून पोलीस कंट्रोलला जावे लागणार आहे. तर प्रभारी ठाण्यांचा चार्ज दुय्यम अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्याचेही पोलिस अधीक्षकांनी आदेश दिले आहे. दरम्यान, श्रीकांत धिवरेंनी आज खेळलेल्या मास्टर स्ट्रोकमुळे पोलीस दलात पुन्हा मोठा भूकंप झाला असून आणखी काही बेशिस्त कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!