क्राईम

मणिपूरातील “त्या” महिलांना पोलिसांनीच केले जमावाच्या स्वाधीन – सीबीआयच्या आरोपपत्रात धक्कादायक माहिती समोर

जनसूर्या मीडिया

 

मणिपूरमध्ये गेल्या वर्षी झालेल्या जातीय हिंसाचाराची धक्कादायक बाजू समोर आली आहे. विवस्त्र करून रस्त्यावर धिंड काढलेल्या कुकी समाजातील महिलांना पोलिसांनीच जमावाच्या स्वाधीन केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
गुन्हेगारांपासून पळून गेल्यानंतर महिला पोलिसांकडे मदतीसाठी गेल्या असता सुरक्षारक्षकांनी त्यांना गुन्हेगारांच्या ताब्यात दिल्याचे सीबीआयच्या आरोपपत्रात उघड झाले आहे. आरोपपत्रात दावा करण्यात आला आहे की, पोलिसांनी महिलांना त्यांच्या वाहनातून १०० मेईतेई दंगलखोरांच्या जमावाकडे नेले. गेल्या वर्षी मणिपूरमध्ये झालेल्या जातीय हिंसाचारात शेकडो लोकांचा मृत्यू झाला होता. यादरम्यान कुकी समाजातील दोन महिलांना मेईतेई समाजातील दंगलखोरांनी नग्नावस्थेत रस्त्यावर धिंड काढली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मणिपूरमधील जातीय हिंसाचार दाखवणारा हा व्हिडिओ या घटनेनंतर बराच काळ चर्चेचा विषय ठरला. या संपूर्ण घटनेवर सीबीआयने आपल्या आरोपपत्रात मोठा खुलासा केला आहे.
सीबीआयने आरोपपत्रात म्हटले आहे की, दोन्ही महिलांवर सामूहिक बलात्कार करण्यापूर्वी त्यांना विवस्त्र करून त्यांची परेड करण्यात आली. राज्यात जातीय हिंसाचार सुरू असताना ही घटना घडली.

कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांच्या पत्नीचाही समावेश

आरोपपत्रात म्हटले आहे की, तिन्ही पीडितांनी घटनास्थळी उपस्थित पोलिसांकडे मदत मागितली होती, परंतु त्यांना कोणतीही मदत मिळाली नाही. आरोपपत्राचा तपशील देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, पीडित महिलांपैकी एक कारगिल युद्धात काम केलेल्या सैनिकाची पत्नी होती. अधिकाऱ्यांनी सांगितले की, महिलांनी पोलिसांना वाहनात सुरक्षित ठिकाणी नेण्यास सांगितले होते, परंतु पोलिसांनी कथितपणे त्यांना सांगितले की त्यांच्याकडे वाहनाच्या चाव्या नाहीत आणि त्यांनी कोणतीही मदत केली नाही.
मणिपूरमध्ये गेल्या वर्षी ४ मे घडलेल्या घटनेच्या जवळपास दोन महिन्यांनंतर, जुलैमध्ये हा हृदयद्रावक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला होता, ज्यामध्ये दोन महिलांना पुरुषांच्या जमावाने घेरले होते आणि त्यांना नग्न केले जात होते. सीबीआयने गेल्या वर्षी १६ ऑक्टोबर रोजी गुवाहाटी येथील विशेष न्यायाधीश सीबीआय न्यायालयात सहा आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते.
त्यात म्हटले आहे की, एके रायफल, एसएलआर, इन्सास आणि ३०३ रायफल्स यांसारख्या अत्याधुनिक शस्त्र असलेल्या सुमारे ९०० -१,००० लोकांच्या जमावापासून दोन महिला पळून जात होत्या. सैकुल पोलिस स्टेशनच्या दक्षिणेस सुमारे ६८ किलोमीटर अंतरावर असलेल्या कांगपोकपी जिल्ह्यातील त्याच्या गावात जमावाने जबरदस्तीने प्रवेश केला. जमावापासून वाचण्यासाठी महिला इतर पीडितांसह जंगलात धावल्या, परंतु दंगलखोरांनी त्यांना पाहिले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, गर्दीतील काही लोकांनी महिलांना मदतीसाठी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पोलिस वाहनाकडे जाण्यास सांगितले.
दोन्ही महिला पोलिसांच्या वाहनात घुसण्यात यशस्वी झाल्या ज्यात दोन पोलिस आणि चालक आधीच बसले होते, तर तीन-चार पोलिस वाहनाबाहेर होते. ड्रायव्हरला त्यांना सुरक्षिततेकडे घेऊन जाण्याची विनंती केली परंतु चावी नसल्याचे कारण सांगण्यात आले. पीडितांपैकी एकाचा पती भारतीय सैन्यात आसाम रेजिमेंटमध्ये सुभेदार म्हणून कार्यरत होता.वाहनात बसलेल्या व्यक्तीच्या वडिलांना जमावाच्या हल्ल्यापासून वाचवण्यासाठी पोलिसांनीही मदत केली नाही, असा सीबीआयचा आरोप आहे.

पोलिसांसमोर मागितली मदत

त्यानंतर चालकाने वाहन घेऊन सुमारे एक हजार लोकांच्या जमावासमोर ते थांबवले. पीडितांनी पोलिसांना सुरक्षित ठिकाणी नेण्याचे आवाहन केले, परंतु त्यांनी कोणतीही मदत केली नाही. दोन महिलांसह कारमध्ये बसलेल्या व्यक्तीच्या वडिलांची जमावाने आधी हत्या केल्याचे तपास यंत्रणेने सांगितले. यानंतर वाहनात बसलेल्या पुरुष पीडितेलाही मारहाण करण्यात आली. त्याचा मृतदेह गावाजवळील कोरड्या नदीत फेकून दिले.
पोलिसांनी पीडितांना हिंसक जमावाच्या स्वाधीन केले आणि निघून गेले. आरोपपत्रात म्हटले आहे की, दंगलखोरांनी महिलांना बाहेर खेचले आणि त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्यापूर्वी त्यांना नग्न केले. आरोपपत्रात म्हटले आहे की, तिसऱ्या महिलेने नातवासोबत दुसऱ्या गावात पळून आपला जीव वाचवला आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या गावात तिच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
सीबीआई ने हेरोदास मेईतेई आणि इतर पाच जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले असून एका अल्पवयीन मुलाविरुद्ध अहवालही दाखल केला आहे. मणिपूर पोलिसांनी जुलैमध्ये हेरोदासला अटक केली होती. सीबीआयने सांगितले की, आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांतर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत, ज्यात सामूहिक बलात्कार, खून, महिलेची विनयभंग करणे आणि गुन्हेगारी कट रचणे या कलमांचा समावेश आहे.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!