महाराष्ट्र

हळदीच्या कार्यक्रमातील जेवणातून २०० जणांना विषबाधा; रुग्णांमध्ये सात बालकांचाही समावेश

अहमदनगर –

मागील काही दिवसांपासून सतत सार्वजनिक जेवणाच्या कार्यक्रमातून विषबाधा होण्याच्या घटना समोर येत आहेत. अशात अहमदनगर जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, हळदीच्या कार्यक्रमातील जेवणातून २०० जणांना विषबाधा झाली आहे.
अकोले तालुक्यातील मवेशी करवंदरा येथील ही घटना असून, नवरदेवाच्या घरी आयोजित करण्यात आलेल्या हळदीचा कार्यक्रमात हा प्रकार समोर आला आहे. हळदीच्या कार्यक्रमातील जेवणातून झालेल्या विषबाधानंतर अनेकांना जुलाब आणि उलटीचा त्रास जाणवल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. ज्यात, ५९ लोकांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात तर काहींना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलवले आहे. विषबाधा झालेल्यांमध्ये सात बालकांचा समावेश आहे.
घरात लग्नकार्य असल्याने अकोले तालुक्यातील मवेशी करवंदरा येथील एका कुटुंबात हळदीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पाहुण्यांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, जेवण झाल्यावर अनेकांना जुलाब आणि उलटीचा त्रास सुरु झाला. पाहता पाहता त्रास होणाऱ्यांची संख्या वाढली आणि एकच गोंधळ उडाला. त्यामुळे ५९ लोकांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात तर काहींना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यात ७ लहान बालकांचा देखील समावेश आहे. सुदैवाने कोणतेही जीवितहानी झाली नसून, विषबाधा झालेल्या सर्व लोकांवर उपचार करण्यात येत आहेत. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस देखील रुग्णालयात पोहचले असल्याची माहिती मिळत आहे.

अकोला जिल्ह्यात शालेय पोषण आहारातून विषबाधा…

अकोला जिल्ह्यात देखील असाच विषबाधा झाल्याचा प्रकार बुधवारी समोर आला होता. अकोला शहरात असणाऱ्या मनपाच्या शाळेत विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारातून विषबाधा झाल्याने एकच खळबळ उडाली होती. मुलांना शाळेत दिले जाणाऱ्या पोषण आहाराच्या खिचडीत चक्क मेलेल्या उंदराचे अवशेष सापडल्याने विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. मुलांनी पोषण आहार खाल्ल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांची तब्येत बिघडली, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या घटनेत १० विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची माहिती समोर आली होती आणि त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना उलट्या आणि मळमळ झाल्यामुळे हा प्रकार समोर आला आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना अकोला जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. शालेय पोषण आहाराच्या खिचडीत मृत उंदराचे अवशेष सापडल्यामुळे हा प्रकार घडल्याचं समोर आले आहेत.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!