अमरावती प्रतिनिधी –
स्थानिक पदाधिकारी आणि शिवसेनेचा विरोध डावलून अमरावती लोकसभेसाठी भाजपने खासदार नवनीत राणा यांना उमेदवारी दिली. भाजपने तिकिट दिल्यानं नवनीत राणा यांनी त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभीमान पक्षाचा राजीनामा दिला.
यावरुन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रवी राणा यांच्याबाबत मोठं विधान केलं होतं. एक दिवस नवनीत राणा याच रवी राणा यांना भाजपमध्ये आणतील असा दावा बावनकुळे यांनी केला होता. या सर्व वादात आता प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी उडी घेतली आहे.
मी माझ्या जीवनात कोणत्याही पक्षात जाणार नाही, अशी प्रतिक्रिया बडनेरा मतदार संघाचे आमदार रवी राणा यांनी दिली होती. यावर बच्चू कडू बोलताना म्हणाले की रवी राणा यांनी हा स्वाभिमान टिकवून ठेवला, त्यांना शाबासकी दिली पाहिजे. नवनीत राणा भाजपामध्ये गेल्यानंतरही त्यांच्या घरावर त्यांनी स्वाभिमानाचा झेंडा कायम ठेवला. मग भाजपचा झेंडा कुठे लावाल? हा संभ्रम निर्माण करणारा प्रश्न आहे. राणा यांनी एक बाजू मोकळी ठेवली आहे, जर केंद्रामध्ये काँग्रेसची सत्ता आली तर पुन्हा राणा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत, त्यांच्या बोलण्याचा अर्थ स्पष्ट आहे, नवनीत राणा या भाजपमध्ये आहे. पण मी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊ शकतो.
सत्तेसोबत आम्ही असलो पाहिजे अशी व्यवस्था त्यांनी केली आहे. त्यामूळे राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, काँग्रेस व मतदारांनी लक्षात घेतलं पाहिजे. एका घरात दोन पक्षाचे लोक, नवरा वेगळा आणि पत्नी वेगळी, यावर पीएचडी केली पाहिजे. रवी राणा नेमकं कोणत्या पक्षात आहे? याच संशोधन झालं पाहिजे, त्यांचा विचार चिंतन मंथन मतदारांनी केली पाहिजे अशी टीका बच्चू कडू यांनी केली.
अमरावतीत तिरंगी लढत
नवनीत राणा यांना २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला होता. निवडणूक जिंकल्यानंतर नवनीत राणा यांना भाजपला पाठिंबा दिला. आता यावेळी त्या भाजपच्या तिकीटावर लोकसभेच्या मैदानात उतरल्या आहेत. त्यांच्याविरोधात काँग्रेसने बळवंत वानखेडे यांना उमेदवारी दिलीय. तर प्रहारकडून दिनेश बूब आणि रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर हे उमेदवार आहेत.
Post Views: 80
Add Comment