अमरावती

मतदान करतेवेळी बटण दाबताना मोबाईलमध्ये चित्रीकरण करणे भोवले ; तब्बल ३९ दिवसानंतर गुन्हा दाखल

अमरावती : प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीच्या मतदानादरम्यान एका उमेदवाराला मत देण्यासाठी ईलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रावरील (इव्‍हीएम) बटन दाबत असतानाची चित्रफित काढल्याप्रकरणी खोलापुरी गेट पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध तब्‍बल ३९ दिवसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा प्रकारच्‍या या पहिल्‍याच गुन्‍ह्याची नोंद शहरात झाली आहे.
इव्‍हीएमचे बटन दाबत असताना मोबाईलमधून चित्रफित काढण्‍याचा हा प्रकार शारदा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथील खोली क्रमांक ३ येथे उघडकीस आला होता. अमरावती मतदार संघात गेल्‍या २६ एप्रिल रोजी मतदान झाले होते. मतदान केंद्र अधिकारी विजय कैकाळे यांनी यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी बडनेरा विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्रमांक ६७ शारदा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे मतदानाची प्रक्रिया सुरू होती. त्या दरम्यान, एका अज्ञात व्यक्तीने कैकाळे यांच्या नकळत एका उमेदवाराच्या चिन्हासमोरील बटन दाबताना आणि व्‍हीव्‍हीपॅटचा स्वत:च्या मोबाइलमध्ये व्हिडीओ चित्रीत केला. तसेच तो प्रसारित देखील केला. त्यामुळे त्या अज्ञात व्यक्तीने मतदान केंद्राच्या आत व्हिडीओ चित्रीकरण करून निवडणूक आयोगाच्या आदेशाचे उल्लंघन केले.
त्या अज्ञात व्यक्तीने मतदान केंद्राच्या प्रतिबंधित क्षेत्रात व्हिडीओ चित्रीकरण करून निवडणुकीचा प्रचार केला, असा ठपका तक्रारीतून ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी तक्रारीवरून खोलापुरी गेट पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!