क्राईम

पोलीस ठाण्यातच एसीपींच्या वाहनचालकावर कुऱ्हाडीने हल्ला

नागपूर: ( जनसूर्या मीडिया )

 

नागपुरातील कपिलनगर पोलीस ठाण्यात चक्क सहायक पोलीस आयुक्तांच्या वाहनचालकावरच कुऱ्हाडीने वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकाराने खळबळ उडाली होती. पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपीला ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला.
प्रफुल्ल जगदेवराव धर्माळे (४२, नेमसेडा, चांदुरबाजार, अमरावती) असे जखमी कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते अगोदर मोटार परिवहन विभागात कार्यरत होते. सद्यस्थितीत ते सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) यांच्या वाहनावर चालक म्हणून नेमणूकीस आहे. शुक्रवारी त्यांनी सकाळी एसीपींना कपिलनगर पोलीस टाण्यात सोडले. त्यानंतर ते पोलीस ठाण्याच्या परिसरात गाडी साफ करत होते. त्यावेळी दिलीप रामराव चिनकुरे (५३, एन.आय.टी क्वाॅर्टर, कपिलनगर) हा तेथे पोहोचला.
त्याने थेट धर्माळे यांच्यावर लोखंडी कुऱ्हाडीने डोक्यावर वार केले. त्यात धर्माळे जखमी झाले. त्याने तिसरादेखील वार केला. मात्र धर्माळे यांनी तो चुकवला व आरोपीला धक्का दिला. आरडाओरड ऐकून पोलीस ठाण्याचे इतर कर्मचारी धावत आले व त्यांनी आरोपीला पकडले. धर्माळे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या तक्रारीवरून कपिलनगर पोलीस ठाण्यात दिलीपविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक चौकशीत आरोपी मनोरुग्ण असल्याची बाब समोर आली आहे. त्याला वैद्यकीय तपासणीसाठी मेयो इस्पितळात नेण्यात आले. मात्र या घटनेमुळे पोलीस यंत्रणेत चांगलीच खळबळ उडाली होती.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!