स्वतःच्या दुकानात लपविला बापाचा मृतदेह
गोंदिया : जनसूर्या मीडिया
आई-वडिलांसाठी मुलं आणि मुलांसाठी आपले पालक सगळ्यात महत्त्वाचे असतात. हे नातं प्रेमाचं, काळजीचं, आपुलकीचं आणि विश्वासाचं असतं. मात्र, कधीकधी अशा काही घटना समोर येतात, ज्या सगळ्यांनाच हादरवून सोडतात.
अशीच एक घटना आता समोर आली आहे. गोंदिया जिल्ह्यातील तांडा या गावातील रामलाल कांबळे (वय ४८) यांना दारू पिण्याची सवय होती. मुलांनी वारंवार समजावून सुद्धा रामलाल यांचं दारूचं व्यसन मात्र सुटत नव्हतं.
या सगळ्याला कंटाळून रामलाल यांचा मुलगा राकेश कांबळे याने आपल्या दुकानामध्येच हातोड्याने वार करून आपल्या वडिलांचा खून केला. यानंतर दुकान बंद करून निघून गेला. यानंतर वडील बेपत्ता झाल्याचा बनाव करून दोन दिवसापासून परिसरातील नागरिकांसोबत वडिलांचा शोध घेत राहिला. घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी प्रकरणाची चौकशी केली, त्यावेळी राकेशवर संशय आला आणि स्वान पथकामुळे अखेर घटनेचा खुलासा झाला .
यानंतर राकेशनी पूर्ण घटना सांगून आपल्या वडिलांना आपण स्वतः संपवलं असल्याचं तसंच त्यांचा मृतदेह दुकानात असल्याचं सांगितलं. त्यानंतर दुकानात तपासणी केली असता दुकानामध्ये रामलाल यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला दिसला. त्यांच्या डोक्यावर हातोड्याने मारहाण करून राकेश यानी आपल्या वडिलांचा खून केल्याची घटना उघडकीस आली.
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. पुन्हा एकदा वडिलांच्या व्यसनापायी एका मुलाने आपल्या वडिलांचा खून केल्याची घटना गोंदिया जिल्ह्यातील तांडा या गावात घडली. राकेश याला अटक करण्यात आली असून या घटनेचा तपास गोंदिया ग्रामीण पोलीस करत आहेत.
Post Views: 85
Add Comment