दिल्ली – जनसूर्या मीडिया
दिल्लीतील रंजीत रंजन ठाकूर या इन्शुरन्स एजंटने मॅट्रिमोनिअल वेबसाइट्सद्वारे डॉक्टर असल्याचं भासवून अनेक महिलांना फसवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने ५० हून अधिक महिलांना तो त्यांच्याशी लग्न करणार असल्याचं खोटं वचन दिलं आणि नंतर फसवणूक केली. फसवणूक झालेल्या एका महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर हा भयंकर प्रकार समोर आला आहे.
महिला एका मॅट्रिमोनिअल वेबसाइटवर डॉ. अमन शर्मा यांच्या संपर्कात आली, ज्याने लग्नाच्या बहाण्याने तिची फसवणूक केली होती. जवळपास एक लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचं समोर आलं आहे. या व्यक्तीने इतर महिलांना देखील खोटं सांगून आपल्या जाळ्यात ओढलं.
इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, महिलेने दिलेल्या माहितीनुसार, नंतर तिला समजलं की त्या व्यक्तीने तिला फसवण्यासाठी खोटं नाव आणि फोटो वापरला होता. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी एक टीम तयार केली आहे. तपासादरम्यान, फसवणुकीचे पैसे ज्या खात्यात ट्रान्सफर केले होते ते पोलिसांनी शोधून काढलं.
पोलिसांना आरोपीच्या संशयास्पद मोबाईल क्रमांकाचीही माहिती मिळाली. यानंतर कॉल डिटेल रेकॉर्डवरून रंजीत रंजन ठाकूर नावाच्या व्यक्तीचा शोध घेऊन त्याला सागरपूर येथून अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. चौकशीत त्याने तब्बल ५० हून अधिक महिलांना डॉक्टर असल्याचं भासवून त्यांच्याकडून पैसे उकळल्याचं सांगितलं.
Post Views: 70
Add Comment