वर्धा-

लोहमार्ग पोलिसांनी गांजा तस्करांच्या रेल्वेमधूनच आवळल्या मुसक्या ; ८२ किलो गांजा जप्त

“हमसफर” मधून सुरु होती गांजा तस्करी ; ३ महिलांसह ५ जण अटकेत

वर्धा प्रतिनिधी :

रेल्वेमधून गांजाची तस्करी होते, हे अनेकदा झालेल्या कारवाईवरून दिसून आले आहे. मात्र, सेलू स्थानकावरून सुटलेल्या हमसफर एक्स्प्रेसमधून एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी होणे, हे मात्र, प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आहे.
सेलू स्थानकावरून गाडी सुटताच काही व्यक्तींवर संशय बळावला. त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे असलेल्या ट्राॅली बॅगमध्ये जवळपास १२ लाख ३९ हजार ९९० रुपयांचा ८२ किलो ६६६ ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. वर्धा लोहमार्ग पोलिसांनी याप्रकरणी ३ महिला आणि दोन पुरुष अशा पाच आरोपींना बेड्या ठोकल्या. सध्या सर्व आरोपी पोलिस कोठडीत असल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांनी दिली. अमलेश ब्रम्हा (३६, रा. तुगलकाबाद, बदरपूर, दक्षिण दिल्ली), विश्वजित मंडल (३९, रा. नटुनविरपूर, नडिया, पश्चिम बंगाल), दीपाली बाला (३३, रा. तुगलकाबाद, नवी दिल्ली), मीरा सरकार (४२, रा. हरीपूर, पश्चिम बंगाल), दीपाली दास (५०) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून सध्या सर्व आरोपी लोहमार्ग पोलिसांच्या कोठडीत असल्याची माहिती आहे.
लोहमार्ग पोलिसांचे पथक बल्लारशाह ते नागपूरपर्यंत तिरुपती जम्मूतावी हमसफर एक्स्प्रेस रेल्वेगाडीची श्वान पथकासह तपासणी करीत असतानाच सेलू रेल्वेस्थानकाहून गाडी सुटताना बोगी क्र. २ मधील बर्थ क्रमांक १७, २०, २३ च्या खाली श्वानाने मादक पदार्थ असल्याचे संकेत दिले. आरोपींना याबाबत विचारणा केली असता बॅगमध्ये गांजा असल्याचे सांगितले. आरोपींना नागपूर येथे उतरवून तेथून वर्धा लोहमार्ग पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिस पथकाने सर्व आरोपींना अटक केली.
आरोपींकडे असलेल्या एका बॅगमध्ये १६.८४१ किलोग्रॅम, दुसऱ्या ट्राॅली बॅगमध्ये १२.३२१ किलोग्रॅम, तिसऱ्या बॅगमध्ये ६.१६७ किलोग्रॅम, चौथ्या बॅगमध्ये १२.४३६ किलोग्रॅम, पाचव्या बॅगमध्ये १२.३४२ किलोग्रॅम असा एकूण १२ लाख ३९ हजार ९९० रुपयांचा ८२ किलो ६६६ किलोग्रॅम गांजा जप्त केला. आरोपींना रेल्वे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने लोहमार्ग कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!