राजकीय

चार ऐवजी पाच जागा घ्या, उद्यापर्यंत फायनल सांगा ; मविआचा वंचित आघाडीला शेवटचा प्रस्ताव

मुंबई – जनसूर्या मीडिया

वंचित बहुजन आघाडी संदर्भात महाविकास आघाडीची वेट अँड वॉच भूमिका असल्याचं दिसून येतंय. वंचित बहुजन आघाडीला आता चार ऐवजी पाच जागांचा प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीकडून आणखी एक जागा अधिकची देण्याचा आज प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
शिवसेना ठाकरे गटाची यादी ही वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकेनंतर, म्हणजे बुधवारी जाहीर होणार आहे. भिवंडी, सांगली आणि जालना यासारख्या तिढा असलेल्या जागांचा प्रश्न सुटला असल्याची माहिती आहे. भिवंडीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष लढणार, जालन्याची जागा काँग्रेस तर सांगलीची जागा शिवसेना ठाकरे गट लढवणार असल्याची माहिती आहे. तसेच दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटच लढवणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
राजू शेट्टी हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीत सहभागी न झाल्यास शिवसेना ठाकरे गट वेगळा उमेदवार देण्याच्या तयारीत आहे.

महाविकास आघाडीचे जागावाटप फायनल

महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या चर्चेवर अंतिम निर्णय झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यानुसार शिवसेना ठाकरे गट २२ , काँग्रेस १६ तर राष्ट्रवादी १० जागांवर निवडणूक लढवणार आहे. जर वंचित सोबत आली तर शिवसेनेच्या कोट्यातून दोन, काँग्रेसच्या कोट्यातून दोन आणि राष्ट्रवादीच्या कोट्यातून एक जागा सोडण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

प्रकाश आंबेडकर बुधवारी भूमिका जाहीर करणार

महाविकास आघाडी आणि प्रकाश आंबेडकरांमध्ये आज नव्यानं चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंबेडकर आपली भूमिका बुधवारी जाहीर करतील अशी चर्चा आहे. प्रकाश आंबेडकर यांनी अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचं जाहीर केलंय. त्यामुळे आता ते महाविकास आघाडीच्या साथीने लढणार की तिसऱ्या आघाडीचा पर्याय स्वीकारणार हे बुधवारी स्पष्ट होणार आहे.
         प्रकाश आंबेडकर आणि महाविकास आघाडीमध्ये या आधी जागावाटपाची चर्चा झाली आहे. मविआकडून आंबेडकरांना चार जागांचा प्रस्ताव देण्यात आला होता. पण वंचितला ते मान्य नसल्याने त्यावर अंतिम निर्णय होऊ शकला नाही. दरम्यान प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत मतभेद असल्याचं भाष्य करत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहिलं. त्यामध्ये वंचित काँग्रेसला सात ठिकाणी पाठिंबा देईल असा प्रस्ताव त्यांनी मांडला.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!