धामणगाव रेल्वे –
अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज मोझरी यांच्या तत्वप्रणालीनुसार व श्रीगुरुदेव राष्ट्रधर्म प्रचार समिती दासटेकडी संलग्नित तालुका श्रीगुरुदेव सेवा समिती धामणगाव रेल्वे तर्फे स्व.शकुंतलादेवी राधेश्यामजी लोया, धामणगाव रेल्वे यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित श्रीगुरुदेव सर्वांगीण बाल सुसंस्कार निवासी शिबिर “श्यामली” चे आयोजन दिनांक २ मे २०२४ ते १४ मे २०२४ पर्यंत श्रीमती हिरीबाई नंदलालजी लोया स्मृती भवन,धामणगाव रेल्वे येथे करण्यात येत आहे.
आपला देश ऋषि-मुनींचा, संत-देव अवतारांच्या परंपरेचा पवित्र देश मानला जातो.अनेक धर्म,पंथ आणि संप्रदायाचा समावेश असलेला हा भारत देश. आज देशातील भौतिक वातावरणातून प्रत्येक गावातील बहुसंख्य बाल तरुणांना जीवनाचे योग्य संस्कार मिळेनासे झाले. याचे खरे कारण आहे एकांगी धर्मवेडेपणा नि जातियता,हिनदृश्यांचे प्रसारण,भडक जाहिराती, मोबाईल व टीव्ही यांचा नवीन पिढीकडून होत असलेला दुरुपयोग व त्यांचे दुष्परिणाम इत्यादींचा सर्वत्र जीवघेणा सुळसुळाट झाला आहे. या परिणामाने शिक्षण वाढले पण सदाचाराची होळी झाली. निर्भयपणाने सत्याला सत्य व वाईटाला वाईट म्हणण्याची भीती वाटू लागली. त्यामुळे कुटुंबाचे तसेच देशाचे उज्वल भविष्य ज्या बालतरुणांवर अवलंबून आहे त्याचीही बेभान व बेकाम अवस्था झाल्याने आई वडिलांची मनं चिंतेने धास्तावली आहे. तेव्हा हि भिषणता नष्ट होऊन कुटुंबाविषयी, गाव राष्ट्रविषयी, मानवधर्माविषयी बांधिलकी ठेवून देश धर्म संस्कृती व राष्ट्रीय एकात्मता जोपासली जाईल अशा संस्कारयुक्त सद्गुणांनी बाल-तरुणांची मने घडविली जावीत असा सर्वांगीण प्रयत्न राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज संस्थापित अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या तत्वप्रणालीनुसार ग्रामगितोक्त जीवन विकासाचे धडे आजच्या नवयुवकांना देऊन देश-धर्म-संस्कृतीला व राष्ट्रीय एकात्मतेला पोषक असा तरुण घडावा या उद्देशाने आदर्श दिनचर्या ठेवून विद्यार्थ्यांमध्ये सद्गुण-संवर्धन होण्याच्या उद्देशाने वं राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज व कर्मयोगी संत गाडगेबाबा यांची जन्मभूमी व कर्मभूमी असलेला अमरावती जिल्ह्या याच जिल्हयातील धामणगाव रेल्वे तालुक्यामध्ये गेल्या १४वर्षा पासून राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या विचार प्रणालीनुसार नवसामाज निर्मितीचे कार्य श्रीगुरुदेव सर्वांगीण बाल सुसंस्कार निवासी शिबिराच्या माध्यमातून अविरतपणे चालू आहे.
शिबिरामध्ये बौद्धिक तासिके अंतर्गत सर्वधर्म समभाव,थोर पुरुषांचे चरित्र दर्शन, आदर्श दिनचर्या, स्वावलंबन, सामुदायिक ध्यान-प्रार्थना, रामधुन, ग्रामगीता, श्लोक, इत्यादी तर व्यायाम तासिके अंतर्गत सूर्यनमस्कार, योगासने, प्राणायाम, लाठी-काठी,मल्लखांब, कराटे, दांडपट्टा, पिरॅमिड्स तसेच संगीत तासिके अंतर्गत भजने, अभंग, मंगलाष्टके, स्वागतगिते, तबला, पेटी, टाळ, खंजिरी आदींचे प्राथमिक शिक्षण इत्यादी विषय शिबिर काळात विध्यार्थ्यांना शिकवले जातील.
विभिन्न जाती धर्म व पंथ असलेल्या या भारत देशात वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना अभिप्रेत असलेला सर्वधर्मसमभाव व आई वडील व ज्येष्ठांची आज्ञा पालन करणारा सुसंस्कृत बालक तयार करण्यासाठी आज अशा सु-संस्कार शिबीरांची समाजाला नितांत गरज आहे. व्यक्तिमत्व साधणाऱ्या या शिबिरात आपल्या भागातील वय १२ ते १८ वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांना एकदा अवश्य पाठविण्याचे करावे. स्थानीय लोया भवन येथे नुकतीच बैठक घेऊन सुसंस्कार शिबिर घेण्याबाबत निर्णय घेण्यात आला. या शिबिर आढावा बैठकमध्ये विठ्ठलदादा काठोडे , रमेशराव ठाकरे,गोपालजी भूत,दीपक इंगळे,रवी चौधरी,गोविंद कपिले,गजानन भेंडे,सागर ठाकरे,प्रशांत टांगले,विनोद मानकर,छबन वाट,अतुल दुधे,प्रशांत टांगले, राधेश भूत,विनोद मानकर, प्रदीप डेरे, सुरेश ठाकरे ,अरुण ठाकरे इत्यादी सदस्य उपस्थित होते.
Post Views: 83
Add Comment