मुंबई : जनसूर्या मीडिया
प्रसिद्ध एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांना मुंबई हायकोर्टाने मोठा झटका दिला आहे. हायकोर्टाने लखनभैय्या फेक एन्काउंटर प्रकरणात प्रदीप शर्मा यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
मुंबई हायकोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर प्रदीप शर्मा यांना येत्या तीन आठवड्यात आत्मसर्पण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबई हायकोर्टाने या प्रकरणातील इतर आरोपींनादेखील जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ११ नोव्हेंबर २००६ या दिवशी राम नारायणविश्वनाथ गुप्ता उर्फ लखनभैया यांची फेक एन्काउंटरद्वारे हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. याच प्रकरणी कोर्टात सुनावणी सुरु होती. विशेष म्हणजे मुंबई हायकोर्टात हे प्रकरण येण्याआधी कनिष्ठ कोर्टात या प्रकरणी सुनावणी पार पडली. कनिष्ठ कोर्टाने प्रदीप शर्मा यांच्यासह त्यांच्या १२ सहकाऱ्यांची निर्दोष मुक्तता केली होती. पण मुंबई हायकोर्टाने त्यांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
प्रदीप शर्मा हे १९८३ च्या बॅचचे अधिकारी आहेत. ते २०२० मध्ये निवृत्त होणार होते. पण त्याआधीच त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली होती. गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी राजकारणात एन्ट्री मारली होती. विशेष म्हणजे त्यांनी शिवसेनेच्या तिकीटावर नालासोपारा मतदारसंघातून निवडणूकही लढली होती. पण त्यांचा पराभव झाला होता.
नेमकं प्रकरण काय?
प्रदीप शर्मा यांनी त्यांच्या १३ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह ११ नोव्हेंबर २००६ ला अंधेरीतील सात बंगला येथे फेक चकमक घडवून आणली होती. या चकमकीत त्यांनी लखनभैयाची हत्या केली होती. तसेच लखनभैयाची एन्काउंटरमध्ये हत्या झाल्याचा बनाव रचला होता. या प्रकरणी लखनभैयाचे वकील रामप्रसाद गुप्ता यांनी कोर्टात धाव घेतली होती. त्यांनी सातत्याने कोर्टात युक्तिवाद केला. कोर्टाने या प्रकरणी एसआयटी स्थापन करत चौकशीचे आदेश दिले होते. या प्रकरणी प्रदीप शर्मा यांना २००८ मध्ये निलंबित करण्यात आलं होतं. पण पुढे कोर्टाने त्यांची निर्दोष मुक्तता केल्यानंतर त्यांचं निलंबन मागे घेण्यात आलं होतं.
मुंबई सेशन कोर्टाने या प्रकरणी २०१३ मध्ये ११ पोलीस आणि २१ जणांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. यावेळी प्रदीप शर्मा यांना निर्दोष ठरवण्यात आलं होतं. या निकालाविरोधात वकील रामप्रसाद गुप्ता यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. तसेच इतर ११ आरोपींनी जन्मठेपेच्या शिक्षाविरोधात मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. अखेर या प्रकरणांची एकत्रित सुनावणी पार पडली. मुंबई हायकोर्टाने प्रदीप शर्मा यांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
Post Views: 79
Add Comment