देश

तब्बल २ मिनिटं रुग्णवाहिकेला रस्ता न दिल्याने चालकाला घडली जन्माची अद्दल

अडीच लाख रुपये दंडासह, कायमचा परवाना रद्द

रुग्णवाहिका रस्त्यावरुन जात असताना समोरुन जाणाऱ्या कारने तिला अजिबात रस्ता दिला नाही. तब्बल दोन मिनिटं रुग्णवाहिका कार चालक वाट देईल याची वाट पाहत होता. याचा व्हिडीओही समोर आला आहे.
रुग्णवाहिकेचा रस्ता अडवणं एका कारचालकाला भरपूर महागात पडलं आहे. पोलिसांनी चालकाला तब्बल २ लाख ५० हजारांचा दंड ठोठावला आहे. तसंच त्याचा वाहतूक परवाना कामयचा रद्द केला आहे. त्रिशूर मेडिकल कॉलेजकडे जाणाऱ्या चालकुडी मार्गावर ७ नोव्हेंबर रोजी ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णवाहिका पोन्नानी येथून प्रवास करत होती. डॅशकॅम फुटेजमध्ये रेकॉर्ड झालेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि केरळ पोलिसांनी त्यावर तातडीने कारवाई केली.
दोन मिनिटांच्या फुटेजमध्ये दिसत आहे की, रुग्णवाहिका दोन लेन असणाऱ्या रस्त्यावर मारुती सुझुकी कारच्या मागे धावत होती. यादरम्यान रुग्णवाहिकेचा सायरन वाजत होता. याशिवाय चालकही सतत हॉर्न देत होता. पण यातील कशाचाही चालकावर परिणाम होत नव्हता. चालकाने एकदाही रुग्णवाहिकेला पुढे जाण्यासाठी जागा दिली नाही. याउलट रुग्णवाहिका ओव्हरटेक करु शकणार नाही याचा प्रत्येक प्रयत्न त्याच्याकडून सुरु होता.
वाहन मालकाला रुग्णवाहिकेच्या जवळ असतानाही जागा न दिल्याप्रकरणी मोटार वाहन कायद्याद्वारे अधिकार प्राप्त प्राधिकरणाच्या कार्यात अडथळा आणल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला आहे. मोटार वाहन कायद्याच्या कलम १९४ इ नुसार, जर खासगी वाहन चालवताना कोणीही अग्निशमन सेवा किंवा रुग्णवाहिका किंवा राज्य सरकारने निर्दिष्ट केल्याप्रमाणे इतर आपत्कालीन वाहनाला जागा देण्यास अपयशी ठरला तर त्याला कारवासाची शिक्षा होऊ शकते. ही शिक्षा सहा महिन्यांपर्यंत वाढू शकते. किंवा दहा हजार रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
एका इंस्टाग्राम युजरने वाहन मालकाच्या घरी पोलीस पोहोचल्याचा फोटोही शेअर केला आहे. त्यांनी मल्याळममध्ये कॅप्शनही लिहिले आहे. “रुग्णवाहिकेचा रस्ता अडवल्याबद्दल घऱाला ट्रॉफी दिली जात आहे. पोलिसांना सलाम.”
दरम्यान एका व्यक्तीने रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना टॅग केलं असून लिहिलं आहे की, “रस्ता सुरक्षा नियम आणि कायद्यांचा एक भाग म्हणून, रुग्णवाहिकेला रस्ता देणे ही एक महत्त्वाची बाब आहे. जे लोक याचं पालन करणार नाहीत त्यांना दंड केला जावा. काल मी अशीच एक घटना पाहिली जेव्हा एका रुग्णवाहिका चालकाला जागा मागण्यासाठी हॉर्न वाजवावा लागला”.
“असे अमानुष आणि स्वार्थी कृत्य अजामीनपात्र गुन्हा ठरले पाहिजे. तो तुरुंगातच सडला पाहिजे,” अशी कमेंट एकाने केली आहे. तिसऱ्याने म्हटलं आहे की, “प्रकृती गंभीर असणाऱअया रुग्णाला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला रस्ता न दिल्याबद्दल जिद्दी कार चालकावर दंड आकारण्याचे आणि चालकाचा परवाना अपात्र ठरवण्याचे पोलिसांचे पाऊल कौतुकास पात्र आहे”
“२ .५ लाख दंड आणि परवाना रद्द करणं हे या प्रकरणात, परावृत्त करण्यासाठी एक मजबूत कायदेशीर परिणाम म्हणून पाहिले जाऊ शकते. हे स्पष्ट संदेश पाठवते की वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन, विशेषत: जे आपत्कालीन सेवांमध्ये अडथळा आणतात, त्यांना खूप गांभीर्याने घेतले जाते,” असं एकजण म्हणाला आहे.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!