१ आठवड्यापासून सातत्याने शासकीय कामात अडथडा, तरीही कार्यवाहीसाठी प्रशासनाची चालढकल
धामणगाव रेल्वे प्रतिनिधी
तालुक्यापासून ८ किलोमीटर अंतरावर असलेल्या गंगाजळी गावात सातत्याने एका आठवड्यापासून शासकीय नाली बांधकामात जाणीवपूर्वक अडथडा आणण्याचे काम काही समाजकंटकाकडून सुरु आहे, त्याचे नेमकं कारण म्हणजे दलित वस्तीतील नागरिकांचे सांडपाणी आमच्याकडे नकोच… त्यामुळे सातत्याने नाली विषयीचा वाद हा गावामध्ये सुरु आहे. आता तुम्ही म्हणाल कि, आजच्या विज्ञान युगात सुद्दा असं पाहायला मिळते का? तर हो याची प्रचिती गंगाजळी गावात दिसून येत आहे. त्यामुळे गावात कधीही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
सविस्तर असे कि, गावातील नाईक आणि वानखडे यांच्या घरातील सांडपाणी हे रस्त्यावर येत असल्यामुळे जळगाव आर्वी ग्रामपंचायत मार्फत २०२२ मध्ये उतार भागाने नाली काढणे ठरले असताना तेव्हा सुद्धा दलितांचे पाणी आमच्या घरासमोरून पाहिजे नाही म्हणून काहींनी तक्रार केली होती. त्याकारणाने तसेच निधी उपलब्ध नसल्यामुळे बंधिस्त पाईपलाईन नाली टाकून तात्पुरते पाणी उताराच्या विरुद्ध दिशेने का होईना ते काढण्यात आले होते. मात्र पावसाळा आला कि, सरळ नालीतीलच सांडपाणी वानखडे यांच्या घरात शिरत असल्यामुळे, वानखडे यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने २३ – २४ च्या आराखड्यातील दलित वस्ती सुधार योजना मधून २ लाख उघड्या नालीसाठी मंजूर असून त्याचे बांधकाम मागील १ आठवड्यापासून गंगाजळी येथे सुरु आहे. मात्र शासकीय नालीला उतार असताना सुद्धा फक्त आणि फक्त त्या दलित वस्तीतील नालीचे पाणी आमच्या घराजवळ असलेल्या नालीला जोडायचे नाही, तसेच दलित वस्तीच्या नालीतील सांडपाणी हे दलित वस्तीतूनच गेले पाहिजे म्हणून सातत्याने काही समाजकंटकडून विरोध सुरु आहे. वास्तविक पाहता शासकीय नालीचे बांधकाम करताना कुणीही त्यात अडथडा आणू शकत नाही मात्र त्याच्या विपरीत गंगाजळी गावात खुलेआम विरोध होत असताना सुद्धा ग्रामपंचायत प्रशासन हे कार्यवाही साठी चालढकल करीत असल्याचे निदर्शनात येत आहे.
हीच ती उतार भागाची नाली ज्यामध्ये दलितांचे सांडपाणी काढण्यास विरोध होत आहे..
समाजकंटकाकडून सरपंच, ग्रामसेवक यांच्या सोबत सुद्धा अभद्र भाषेचा वापर
२ मार्च रोजी गंगाजळीत सुरु असेलेले शासकीय नालीचे बांधकाम काही समाजकंटकांनी अडथडा आणून बंद केल्यामुळे गावाचे सरपंच सत्यभामा कांबळे, उपसरपंच गणेश उईके तसेच ग्रामसेवक जी. एन. काळमेघ यांनी कामाच्या ठिकाणी हजेरी लावली असताना त्यांच्याशी सुद्दा अभद्र भाषेचा वापर करीत आम्ही येथून नाली होऊ देणार नाही तुम्हाले जे कराचे ते करून घ्या असे सांगण्यात आले, मात्र पोलीस पाटील यांच्या मध्यस्थीने काम सुरु करण्याचे ठरले असताना दुसऱ्या दिवशी पुन्हा कामात अडथडा निर्माण करण्यात आला. तर आमच्या कडील नालीला हातच लावायचा नाही अन्यथा डोके फोडण्यात येईल म्हणून कामगारांना सांगण्यात आले.
पोलीस पाटलांची मध्यस्थी मात्र दुसऱ्या दिवशी ठरली निकामी
शनिवार रोजी सरपंच, उपसरपंच गावात काम पाहायला आले असताना त्यांच्याशी सुद्दा गावातील समाजकंटकांनी मुजोरी केली. मात्र गावातील पोलीस पाटील भारती गावंडे यांनी नाली सरळ करून नंतर उताराने पाणी काढा असे सांगितल्याने काम सुरु झाले. मात्र दुसऱ्यादिवशी पोलीस पाटलांची मध्यस्थी सफशेल फेल ठरली.. सातत्याने शासकीय कामात अडथडा होत असताना सुद्दा त्यावर तत्परने कार्यवाही होत नसल्याने समाजकंटकांना आपले काहीच वाकडे होत नाही असा समज निर्माण झाला आहे त्यामुळे गावातील वातावरण बिघडून कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच गावात कुठल्याही प्रकारे वाद झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी हि ग्रामपंचायत प्रशासनाची असेल, त्यामुळे ग्रामपंचायत तसेच पोलीस प्रशासनाने वेळीच दखल घेऊन सदरचा नाली बांधकामाचा विषय पूर्णत्वास न्यावा असे गावातील वैचारिक नागरिकांचे म्हणणे आहे.
गावात काम पाहायला गेली असता एका मुलाने अभद्र भाषा वापरली परंतु पोलीस पाटील यांच्या मध्यस्थीने काम सुरु झाले म्हणून तक्रार दिली नाही. परंतु पुन्हा शासकीय काम अडविल्याने उदयाला पोलिसात तक्रार करणार…
सत्यभामा प. कांबळे, सरपंच जळगाव आर्वी
Add Comment