क्राईम

महाविद्यालयीन तरुणीच्या तोंडात बोळा कोंबून गळा दाबून निर्घृण खून; डोक्यात घातला दगड

गेल्या आठवड्यात भरदिवसा व मुख्य चौकात एका तरुणाचा धारदार कोयत्याने खून करण्यात आला होता.

जत (सांगली) : जनसूर्या मीडिया 

         शहरातील रामविजय पॅलेसशेजारीअसलेल्या पडक्या खोलीत एका महाविद्यालयीन तरुणीचा गळा आवळून व डोक्यात दगड घालून निर्घृणपणे खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. अक्षता सदाशिव कोरे (वय २१, रा. सैनिक नगर, शेगाव रोड, जत) असे मृत तरुणीचे नाव असून, सोमवारी (ता. ११) सकाळी ३ वाजण्याच्या सुमारास महाविद्यालयापासून काही अंतरावरच ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अक्षताच्या एकाच वर्गातच शिकत असलेल्या निखिल कांबळे (वय २१, रा. छत्रपती शिवाजी पेठ, जत) या महाविद्यालयीन तरुणाला ताब्यात घेतले आहे. चौकशीत त्याने पोलिसांकडे खुनाची कबुली दिली आहे. मात्र, हे कृत्य त्याने कोणत्या कारणातून केले, याची माहिती रात्री उशिरापर्यंत मिळाली नाही. या घटनेची जत पोलिस ठाण्यात उशिरा नोंद झाली आहे.
पोलिसांनी व घटनास्थळाहून मिळालेली माहिती अशी की, अक्षता कोरे व संशयित आरोपी निखिल कांबळे हे दोघेही जत शहरातील एका महाविद्यालयात बी.ए.-१ च्‍या वर्गात शिकत होते. सोमवारी सकाळी अक्षताचे वडील तिला महाविद्यालयात सोडून गेले. दुपारी १२.३० वाजता वडील तिला आणण्यासाठी गेले होते. मात्र, दीड वाजले तरी मुलगी येत नाही हे पाहून त्यांनी शिक्षकांकडे विचारणा केली. महाविद्यालय सुटून बराच वेळ झाल्याचे शिक्षकांनी सांगितले. त्यावर वडिलांनी तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. ती सापडत नव्हती.
दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास अक्षता हिचा मृतदेह रामविजय पॅलेसजवळ असलेल्या पडक्या खोलीच्या बाहेरील बाजूस आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, पडक्या खोलीत अक्षताच्या तोंडात बोळा कोंबून गळा दाबून खून करण्यात आला होता. शिवाय, तिच्या डोक्यावर दगडाने वार केल्याचे व तोंडावर गंभीर मार लागल्याचे दिसून आले. मृतदेहाशेजारी निखिल कांबळे याचे महाविद्यालयातील ओळखपत्र आढळून आल्याने पोलिसांनी त्याला त्याच्या घरातून तत्काळ ताब्यात घेतले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. यावेळी सांगलीचे श्वानपथक व ठसेतज्ज्ञ पथकानेही घटनास्थळी भेट दिली. ही घटना कळताच सांगलीच्या अपर पोलिस अधीक्षक रितू खोकर व जतचे पोलिस उपधीक्षक सुनील साळुंखे यांनी घटनास्थळी भेट दिली. अधिक तपास पोलिस निरीक्षक सूरज बिजली करत आहेत.

आठवड्याभरात खुनाची हि दुसरी घटना

गेल्या आठवड्यात भरदिवसा व मुख्य चौकात एका तरुणाचा धारदार कोयत्याने खून करण्यात आला होता. त्यानंतर आठवड्यात तरुणीचा गळा दाबून निर्घृणपणे भरदिवसा महाविद्यालयापासून काही अंतरावर खून झाला आहे. यामुळे जत शहरासह तालुका हादरून गेला आहे. पालक वर्गात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या सततच्या घटनांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!