छत्रपती संभाजीनगर :
मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलन सुरू केलं आहे. या आंदोलनादरम्यान काही ठिकाणी हिंसक वातावरण निर्माण झालं आहे. सुरक्षेच्या कारणासाठी तीन जिल्ह्यांमध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. बस सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. तर काही ठिकाणी इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे.
मनोज जरांगे यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने राज्यभरात आंदोलक देखील आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी एसटी बस पेटवून देण्यात आल्याची देखील घटना समोर येत आहे. त्यामुळे मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील तीन जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर गृह विभागाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यातील इंटरनेट सेवा १० तास बंद राहणार आहे. याबाबत गृह विभागाच्या अप्पर मुख्य सचिव सुजाता सैनिक यांनी आदेश काढले आहेत.
छत्रपती संभाजी नगर शहरांमध्ये बऱ्याच ठिकाणी इंटरनेट सेवा बंद करायला सुरुवात झाली असून ग्राहकांना इंटरनेट पुरवणाऱ्या कंपनीकडून इंटरनेट सेवा तात्पुरती बंद करत असल्याचे कॉल देखील सुरू झाले आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये शहराची इंटरनेट सेवा बंद होण्यास सुरुवात झाली आहे. कंपन्यांकडून सेवा बंद करत असल्याचं सांगण्यात आलं आहे.
याआधी छत्रपती संभाजीनगरवरून संपूर्ण बस सेवा बंद करण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाच्या आदेशानंतर बस सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बससेवा करण्यात आल्या बंद करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून बस बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
Post Views: 78
Add Comment