एकट्या “ई” ला तसं बाराखडीत काही विशेष महत्त्व नाही पण जसा त्याच्यापुढे “आ” लागतो तसा तो शब्द शब्दसंग्रहातील भावनात्मक अभिव्यक्तीचं सर्वोत्कृष्ट शब्द बनतो “आई”. परंतु जेव्हा त्या पुढे रमा हे लागतं तेव्हा तो शब्द बनतो “रमाई”.
“रमाई” हा शब्द उच्चारताच त्यागाचं विश्व आणि समर्पणाची भावना हयाच चित्र उभे राहते. मुंबईच्या पारशी कॅालनीमध्ये दोन पैश्याच्या गोवऱ्या या तीन पैशाला विकून परतत असताना सोबतची मैत्रीण रमाईला विचारते की बाकी ठिकाणी दोन पैशाला विकत असताना इथे तीन पैशाला का ? रमाई समजून सांगते, घेणाऱ्याच्या क्षमतेनुसार मी त्या विकल्या आहेत. जग झपाट्याने बदललेलं आहे आधुनिकता, उत्तर आधुनिकता, ग्लोबलायझेशन, डिजिटलायझेशन बदलत्या अर्थव्यवस्थेचे जे सूत्र आहे ते सूत्र नफ्याच्या अवतीभवती आहे. आणि हा नफा मानवाच्या श्रमातून, त्याच्या बौद्धिक श्रमातून अर्जित केल्या जात असतो .
आई रमाई १०० वर्षांपूर्वीच आपल्या कष्टातून गौर्या निर्माण करायची व त्या योग्य भावामध्ये बाजारात विकत असे. आर्थिक परिस्थिती विकट होती. बॅरिस्टर च्या बायकोला कष्ट करण्यामध्ये लाज वाटत नाही व त्या कष्टातून त्या श्रमातून मिळवलेला पैसा व त्याचे योग्य नियोजन बाजाराची सूत्र ही आई रमाईनं शंभर वर्षांपूर्वीच घालून दिली होती. म्हणूनच रमाईचं अर्थशास्त्र समजून घेणे आज रमाई जयंती निमित्त आपल्याला क्रमप्राप्त ठरते. मानवी श्रम, बौद्धिक श्रम याची सांगड घालून योग्य तो नफा आपल्याला मिळवता येऊ शकतो. कुठल्याही कष्टाची, कुठल्याही श्रमाची लाज वाटू न देता त्या श्रमाचे योग्य मूल्य अधिष्ठित करणे , बाजारातील विक्री मूल्य ठरवणे , ही मूलभूत सूत्र आई रमाईनं त्यावेळेसच अंगीकृत केलेली होती. बदलत्या काळाच्या गरजेनुसार ह्या दृष्टिकोनातून कोणी रमाईकडे पाहिलेही नसावे . म्हणूनच आजच्या या लेखाचा हा खटाटोप आहे . केवळ गोवऱ्या विकून अर्थार्जन करणे ,उपजीविका भागवणे ही रमाईच काम नव्हतं परंतु निर्माण झालेली परिस्थिती आणि त्या परिस्थितीतून बाहेर निघण्यासाठी आवश्यक असलेले श्रम त्या श्रमाचा योग्य मोबदला ,विक्री मूल्य ठरवणे हे सगळं रमाईच्या कष्टातून आपल्याला दिसते. रमाई चा अर्थशास्त्र हे कदाचित अनेक मर्यादांनी व्याप्त असेल परंतु प्रेरणेसाठी आपल्याला आवश्यक असलेल्या गोष्टी त्याची बीज आपल्याला रमाईत पाहायला मिळतात .
रमाई कमवलेल्या पैशाचं योग्य नियोजन करते. किती पैसा बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी, आणि किती बचत करावी या सगळ्यांचे सूत्र मांडते. आपण रमाईकडे पाहताना तिच्या कष्टामध्ये असलेलं अर्थशास्त्र समजून घेतलं पाहिजे जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेंव्हा काही अर्थार्जन करून आणायचे, तेव्हा तो पैसा रमाईकडे द्यायचे. रमाई त्या पैशाचं जे नियोजन ठरवायची ते बाबासाहेब स्विकारायचे. यावरूनच बाबासाहेबांनी स्वीकारलेलं होतं रमाईच अर्थशास्त्र व तिचं पैश्याच्या विनीयोगाच धोरण. अनेक मर्यादा, अनेक अभाव, तांत्रिक सुसूत्रता याची कमतरता अशा अनेक गोष्टी असेलही परंतु अर्थशास्त्राच्या मूलभूत गाभ्याला आई रमाईचा स्पर्श झालेलाच होता. दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक स्त्रीमध्ये दडलेली ही रमाई, सावित्री, आई जिजाऊ जिच्या निर्णय प्रक्रियेवर स्वराज्य उभे राहतं , त्या आधुनिक स्त्रीच्या खऱ्या अर्थाने प्रेरणा ठरतील असं मला वाटते. कठोर व ठाम निर्णय प्रक्रिया ही व्यक्तीला समाजाला राज्याला दिशा देत असते ,जिजाऊने घालून दिलेल्या हा घाट, आईसावित्री व आईरमाईचं अर्थशास्त्र हे आजच्या सगळ्या भारतीय स्त्रियांमध्ये उपजतच दडलेलं आहे . यांच्या सामाजिक संस्काराचा तो एक भाग झालेला आहे. मात्र आपल्यामध्ये दडलेल्या आपल्या कौशल्याची जाणीव नसल्यामुळे बहुजन समाजातील स्त्रियांनी, आर्थिक दृष्टीने व्यापार उद्योगाच्या दृष्टीने त्या प्रमाणात विचार केलेला दिसत नाही. आर्थिक साम्राज्यवादाने आपले पाय जगभर पसरली आहेत माणसाची जडणघडण ज्या दिशेने व्हायला हवी ती मूल्यात्मक वाटचाल मूल्य घातक वळणावर येऊन उभी राहिली आहे माणसाला मूल्य युक्त अर्थभान रमाईच्या काटकसरीच्या अर्थकारणातून आपणास शिकायला मिळते नफेखोरी हव्यासाचे अपत्य आहे. श्रमिकांचे अर्थशास्त्रीय धोरण हे करुणादृष्टीत आहे त्याची नाळ मानवतेशी घट्ट जुळवून होती आहे.
रमाईच्या व्यवहारिक दृष्ट्या कुशल निकोप धोरणाकडे आपण पाहिलं पाहिजे .तरी राष्ट्रमाता जिजाऊ, माता सावित्री, आई रमाईचं अर्थशास्त्र हे समजून घेऊन अर्थार्जन -नियोजन -संचयन ही त्रिसूत्री रमाईन आपल्या अर्थशास्त्रात घालून दिली आहे बहुजन स्त्रियांसाठी आपल्या सांस्कृतिक मातांकडून मिळालेली प्रेरणा आहे हे स्वीकारून सुरवात करायला हरकत नाही.
लेखक – डॉ. प्रशांत रोकडे
Add Comment