क्राईम

चिमुकल्याच्या मृत्यू नंतरही ११ दिवस व्हेंटिलेटरवर ठेवले; ६ डॉक्टरांवर गुन्हा दाखल

डॉक्टरांकडे देव म्हणून पाहिले जाते, कारण त्यांच्याकडे गेले की रुग्ण बरा होईल, असा प्रत्येकाला विश्वास असतो. मात्र छत्रपती संभाजीनगरमधून एक संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.
धक्कादायक म्हणजे ऑपरेशन थिएटरमध्ये उपचारासाठी नेलेल्या चिमुकल्याचा चुकीच्या उपचारामुळे मृत्यू झाला. मात्र समोर आलेल्या रुग्णाच्या अहवालानुसार, चिमुकल्याचा मृत्यू ११ दिवसांपूर्वीच झाला होता. मात्र डॉक्टरांनी ही गोष्ट लपवून ठेवत चिमुकल्याला व्हेंटिलेटरवर ठेवले होते. याप्रकरणी ६ डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, साडे पाच वर्षांच्या चिमुकल्याला 20 एप्रिल रोजी खाजेचा त्रास होत असल्याने त्याला गारखेड्यातील वेदांत बाल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी चिमुकल्याची तपासणी केल्यानंतर त्याला फायमोसीस विथ पिनाईल टॉर्नन हा आजार झाल्याचे सांगितले, तसेच ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार चिमुकल्याच्या कुटुंबियांनी त्याला २५ एप्रिलला ऑपरेशनसाठी रुग्णालयात भर्ती केले. यावेळी डॉक्टरांनी सुरुवातीला २० ते २५ मिनिटात ऑपरेशन होईल, अशी माहिती दिली. मात्र ४५ मिनिटे होऊन देखील ऑपरेशन सुरुच होते. यानंतर तासाभराने डॉक्टरांनी ऑपरेशन चांगलं झाल्याची माहिती दिली.
एका डॉक्टरने चिमुकल्याच्या कुटुंबियांना सांगितले की, तुमच्या बाळाला डॉक्टरने स्पाईनमध्ये भूल दिली होती. परंतु त्याने मध्येच हात हलविल्यामुळे पुन्हा एकदा त्याला झोपेचे इंजेक्शन द्यावे लागले. त्यामुळे तुमचा बाळ सध्या बेशुद्ध आहे. मात्र त्यानंतर ६ मेपर्यंत चिमुकल्यावर आयसीयूमध्येच उपचार सुरू होते. यानंतर डॉक्टरांनी चिमुकल्याला मृत घोषित केले. त्यामुळे कुटुंबियांना संशय आला आणि त्यांनी पोलिसात याप्रकरणी तक्रार दाखल केली. यानंतर शासकीय रुग्णालय असलेल्या घाटीतील समितीने अहवाल दिल्यानंतर खरे सत्य समोर आले.
याप्रकरणी वेदांत बाल रुग्णालयाती ६ डॉक्टरांवर पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिमुकल्याचा मृत्यू २४ एप्रिल २०२४ रोजी झाला होता, मात्र डॉक्टरांनी त्याला ११ दिवस व्हेंटिलेटरवर ठेवल्याचे उघड झाले. याप्रकरणी डॉ. अर्जुन पवार, डॉ. शेख इलियास, डॉ. अजय काळ, डॉ. अभिजीत देशमुख, डॉ. तुषार चव्हाण आणि डॉ. नितीन अधाने यांना आरोपी बनवत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, वेदांत बाल रुग्णालयात घडलेल्या घटनेबद्दल माहिती देताना पोलीस उपायुक्त नवणीत कावत यांनी सांगितले की, मृत चिमुकल्याच्या कुटुंबीयांनी एप्रिल महिन्यात तक्रार दाखल करत रुग्णालयावर आरोप केले होते. याप्रकरणी आम्ही त्यांना कायदेशीर तक्रार दाखल करण्यास सांगितले. त्यानंतर रुग्णालयातील सर्व कागदपत्रे आम्ही शासकीय रुग्णालयात पाठवली. त्यांनी दिलेल्या अहवालनुसार आम्ही ६ डॉक्टरांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याबाबत पुढील तपासानुसार निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती नवणीत कावत यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!