क्राईम पुणे

रेल्वेत नोकरीचे आमिष सेवानिवृत्त लष्करी जवानाची १७ लाखांनी फसवणूक

महिलांनी अनेकांची केली फसवणूक, आतापर्यंत १० गुन्हे दाखल

पुणे : जनसूर्या मीडिया

रेल्वेमध्ये तिकीट तपासनीस पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून सेवानिवृत्त लष्करी जवानाची १७ लाख २७ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत सुरेश नाईक (वय ३९, रा. वानवडी) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संजीवनी पाटणे (वय २७, रा. रहेजा गार्डन, केदारी पेट्रोल पंपाजवळ, वानवडी) आणि शुभम मोड (रा. येवलेवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पाटणे या लष्करी जवानांची पत्नी असल्याचे सांगून नातेवाईकांना नोकरी लावण्याचे आमिष दाखवून अनेकांची फसवणूक केली आहे. याबाबत पिंपरी चिंचवडमधील निगडी पोलीस ठाणे, सातारा येथील रहिमतपूर पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखवून असून किमान १० जणांनी या महिलेने फसवणूक केली असल्याचे फिर्यादी सुरेश नाईक यांनी सांगितले.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, आरोपी संजिवनी पाटणे हिने फिर्यादी यांना आपण रेल्वे विभागात टी सी पदावर नोकरी असल्याचे सांगितले. रेल्वेत नोकरी असल्याबाबतचे टी सीचे आयकार्ड, बिल्ला व इतर कागदपत्र पाठवून त्यांचा विश्वास संपादन केला. फिर्यादी यांची भाची व पुतणी यांना रेल्वेत नोकरी लावते, असे सांगून त्यांच्याकडून पैसे घेतले. फिर्यादी यांची भाची यांना रेल्वेतील नियुक्तीचे बनावट पत्र दिले. तसेच पुतणी हिला नोकरीस लावल्याबाबत पैसे भरल्याची बनावट बँक रिसीटचा फोटो फिर्यादीला पाठवून त्यांची फसवणूक केली.
लष्करी जवानाची पत्नी असल्याचे व पती यांना ब्रेन ट्युमर आजार असल्याचे खोटे सांगितले. त्यांच्याकडून औषधोपचाराकरीता वेळोवेळी पैसे घेतले. रेल्वेतील नोकरीबाबत नियुक्तीचे पत्र बनावट असल्याचे समजल्यावर त्यांनी पैसे परत मागितले. तेव्हा फिर्यादी यांना बँकेचे कर्ज मंजूर झाले की पैसे परत करते, असे सांगून टाळाटाळ केली. फिर्यादी यांनी परत पैसे मागितल्यावर एकाने फिर्यादी यांना फोन करुन जीवे मारण्याची धमकी दिली. त्या पैसे परत करण्याची शक्यता नसल्याने शेवटी नाईक यांनी पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली असून वानवडी पोलीस तपास करीत आहेत.
संजीवनी पाटणे हिच्याविरुद्ध निगडी पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला होता. ब्युटी पार्लरचा व्यवसाय करणार्‍या महिलेशी तिने अगोदर मैत्री केली. त्यानंतर माझ्याप्रमाणेच तुला ही टि सी करते असे सांगितले. फिर्यादी व तिच्या भावाला नोकरी लावते, असे सांगून त्यांच्याकडून साडेआठ लाख रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली होती.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!