रिक्षाच्या मोहात लावली होती पैज
जनसूर्या मीडिया
प्रकाशाचा सण म्हणून दिवाळीकडे पाहिले जाते. अंधकाराचा नायनाट करण्यासाठी हा प्रकाशाचा उत्सव जगभरात आता मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. पण काही अतिउत्साही लोकांमुळे सणावारांना गालबोट लागतं.
बंगळुरूमध्ये मन सुन्न करणारी एक धक्कादायक घटना घडली आहे. एका बेरोजगार युवकाला मित्रांनी लावलेली पैज महागात पडली. फटाक्याच्या बॉक्सवर बसणाऱ्याला ऑटोरिक्षा मिळणार अशी पैज काही मित्रांनी लावल्यानंतर बेरोजगार असलेल्या ३२ वर्षीय सबरीशनं हे आव्हान स्वीकारलं. जिंकलो तर रिक्षा मिळेल आणि पोटापाण्याची काहीतरी सोय होईल, या आशेनं सबरीश फटाक्याच्या बॉक्सवर बसला. पण वात पेटताच फटाका फुटला आणि सबरीशचा दुर्दैवी अंत झाला.
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सबरीश आणि त्याचे मित्र ३१ ऑक्टोबर रोजी फटाके फोडून दिवाळी साजरी करत होते. त्याआधी त्यांनी मद्यप्राशन केलं होतं. मद्यप्राशन केल्यानंतर सर्व मित्र फटाके फोडण्यासाठी बाहेर पडले. यावेळी एका मित्राने सबरीशशी पैज लावली. जर फटाक्याच्या बॉक्सवर बसलास तर तुला नवीकोरी ऑटोरिक्षा घेऊन देईल, अशी पैज लावली. सबरीशनंही हे आव्हान स्वीकारलं. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओही आता समोर आला आहे.
सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये दिसत असल्यानुसार सबरीश एकटाच फटाक्याच्या बॉक्सवर बसलेला दिसत आहे. त्याच्या मित्रांनी फटाक्याची वात पेटवली आणि ते सर्व जण सुरक्षित अंतरावर जाऊन उभे राहिले. काही सेकंदात बॉक्सखाली ठेवलेला फटाका फुटतो आणि सबरीश रस्त्यावर कोसळताना दिसतो. फटाका फुटल्यानंतर त्याचे मित्र धावत त्याच्याजवळ येऊन पाहतात, तेव्हा तो जमिनीवर पडलेला आढळून येतो. यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयत दाखल करण्यात येते. फटाक्याच्या तीव्रतेमुळे अंतर्गत अवयवांना धक्का बसून त्याचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झालं आहे. २ नोव्हेंबर रोजी सबरीशचा मृत्यू झाला.
पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. तसेच मानवी मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या कारणावरून सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे
Post Views: 27
Add Comment