सात-बारा उतार्यावर नोंदीसाठी मागितली होती लाच
जनसूर्या मीडिया
साईसिटीमधील खरेदी केलेल्या सदनिकेची नोंद सात-बारा उतार्यावर लावण्यासाठी तलाठी गणेश वैजीनाथ सोनवणे याच्यासह पंटर करण नारायण जगताप लाचलुचपतच्या जाळ्यात अडकला आहे. उतार्यावर नोंद लावण्यासाठी ६ हजार ५०० रुपयाची लाच स्वीकारतांना नगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोघा आरोपींना रंगेहात पकडल्याने खळबळ उडाली आहे.
मागील महिन्यात महसूलमधील दोन अधिकारी लाचप्रकरणी अडकले होते.
या संदर्भात शहर पोलीस ठाण्यात विकास पंढरीनाथ आघाव (रा. साईसिटी कोपरगाव) यांनी फिर्याद दाखल केली आहे. यात फिर्यादीनुसार आघाव यांनी साईसिटी भागात त्यांनी सदनिका खरेदी केली. त्यानंतर नियमानुसार येथील तलाठी कार्यालयात सुची देवून सात बारा उतार्यावर त्यांचे नाव लावण्याकामी त्यांनी कामगार तलाठी गण्ेश वैजीनाथ सोनवणे यांचेकडे पाठपुरावा केला. परंतु नोंद होत नव्हती. सोनवणे यांनी फिर्यादीस ६ हजार ५०० रुपये लाचेची मागणी केली.
फिर्यादीने अहिल्यानगर येथील लाचलुचपत प्रति विभागाकडे धाव घेतल्यानंतर २ जानेवारी रोजी सापळा रचला. त्याप्रमाणे फिर्यादी याने सोनवणेकरिता त्याचा सहकारी पंटर करण जगताप याचेकडे ६ हजार ५०० रुपये रक्कम दिली. ती स्विकारल्याबद्दल जगताप याने फिर्यादी समक्ष तलाठी सोनवणे यांना फोन करुन तुम्ही सांगितलेप्रमाणे घडले ठिकाणी रक्कम स्विकारली आहे, असे सांगितल्यानंतर तलाठी सोनवणे यांनी त्यास संमती दिली. त्याचवेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधिक्षक त्रिपुटे यांचे मार्गदर्शनाखाली झडप टाकली असता रक्कमेसह जगताप याच्याकडे ५०० किंमतीच्या १३ नोटा एकूण रक्कम ६ हजार ५०० मिळून आली.
याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गु र नं २/२०२५ भ्र्.प्र अधि १९८८ चे कलम ७ अ १२ प्रमाणे तलाठी गणेश वैजीनाथ सोनवणे व पंटर जगताप रा. कोपरगाव यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी पोलीस उपअधिक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग व शहर पोलीस निरिक्षक भगवान मथुरे यांनी भेट दिली.
महसूलचा भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर
तहसील कार्यालयातील एक महिन्यापूर्वी आरोपी लिपिक चंद्रकांत चांडे व योगेश पालवे यांनी १५ हजारांची लाच घेतल्याची घटना घडली होती. महसूल खात्यातील तहसिलदार, नायब तहसिलदार, तिन तलाठी, अव्वल कारकून, दोन कारकुन यांच्यावर लाचलुचपत विभागाने आत्तापर्यंत कारवाई केल्यानंतर आता पुन्हा तलाठी व त्याचा मदतनीसामार्फत लाच स्विकारतांना पकडल्याने महसूल खात्यातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चव्हाटयावर आला आहे. महसूल यंत्रणेवर वचक नसल्याने असे प्रकार वारंवार घडत आहे. तहसिलदार व संबंधित अधिकारी नागरिकांचे कामे लवकर करत नाहीत, वारंवार चकरा माराव्या लागतात, दलालांचा विळखाच तहसील विभाग सापडला असल्याने आता महसूल विभागाचे शुद्धीकरण कोण करणार असा प्रश्न आहे.
Post Views: 7
Add Comment