परभणी –
१० डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्यानंतर, ११ डिसेंबर रोजी परभणी जिल्हा बंद पुकारण्यात आला. बंद दरम्यान, दुपारी १२ नंतर शहरातील बाजारपेठेमध्ये दगडफेक आणि जाळपोळीची घटना घडली
त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत धरपकड आणि लाठीचार्ज केला. या कारवाई दरम्यान, बऱ्याच महिलांना पोलिसांनी धरपकड करत मारहाण केल्याचे आता सीसीटीव्हीतील व्हिडिओच्या माध्यमातून समोर येत आहे.
परभणी शहरातील वत्सला मानवते या ५० वर्षीय महिला प्रियदर्शनी नगर भागात राहत आहेत. ११ डिसेंबर रोजी सायंकाळच्या दरम्यान, वसमत रोडवरील सावली विश्रामगृहासमोर असलेल्या ग्राउंडमध्ये पोलिसांकडून आंदोलकांना धरपकड करण्यात येत होती. पोलिसांकडून धरपकड आणि मारहाण करत असल्याचा व्हिडिओ वत्सला मानवते या आपल्या मोबाईलमध्ये बनवत होत्या. मोबाईलमध्ये चित्रीकरण का करत आहेत, म्हणत पोलिसांनी त्यांना पकडले आणि त्यांचा मोबाईल हस्तगत करून त्यांना बेदम मारहाण केली. पोलीस एवढ्यावर थांबले नाहीत तर वत्सला मानवते यांना थेट पोलीस ठाण्यात आणण्यात आले. पोलीस ठाण्यात आल्यानंतर, सायंकाळी सहा ते रात्री अडीच वाजेपर्यंत त्यांना पोलिसांकडून जबर मारहाण करण्यात आली. मारहाणीमध्ये त्यांची प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्यांना रात्री अडीच वाजता जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. आज पाच दिवस झाले, त्या जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या सर्वच शरीरावर मारहाणीच्या खुणा स्पष्ट दिसत आहेत.
पोलिसांनी काहीच ऐकले नाही..
“आंदोलनामध्ये मी सहभागी झाले नव्हते. मी मोर्चामध्ये देखील नव्हते. फक्त माझा गुन्हा एवढाच होता की माझ्यासमोर मारहाण होत होती आणि मी त्याचे माझ्या मोबाईलमध्ये चित्रीकरण करत होते. मी एका दवाखान्यामध्ये सिस्टर म्हणून काम करत आहे. माझा आणि आंदोलनाचा काहीही संबंध नव्हता. मी पोलिसांना ही सर्व गोष्ट सांगत होते, पण पोलिसांनी काहीच ऐकले नाही व मला जबर मारहाण केली. त्यामुळे मला न्याय मिळावा यासाठी मी आता प्रयत्न करणार आहे. मानवाधिकार आयोगाकडे माझ्या नातेवाईकांनी तक्रार केली असून, मला न्याय मिळेपर्यंत मी गप्प बसणार नाही,” असे वत्सला मानवते म्हणाल्या.
दोषी पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
हा संपूर्ण प्रकार आम्ही प्रभारी पोलीस अधीक्षक यशवंत काळे व नांदेड परिक्षेत्राचे आयजी शहाजी उमाप यांच्या समोर मांडला, पण या दोघांनीही याप्रकरणी आपली प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी मात्र संबंधित प्रकाराची दखल घेतली असून, जो कोणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई होईल, असे सांगितले आहे. या प्रकरणी सुजात आंबेडकर यांनी या महिलेची भेट घेऊन पाहणी केली आहे. तसेच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासह परभणी आणि राज्यभरातील आंबेडकरी चळवळीतील नेत्यांनी या प्रकरणातील दोषी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली.
Post Views: 7
Add Comment