क्राईम

कुमारी मातेने पोटच्या गोळ्याला उकिरड्यावर फेकले… एका तासात अविवाहित महिला ताब्यात

माणिकवाडा गावातील घटना

वर्धा – आष्टी : प्रतिनिधी 

जन्म देणारी जननीच आपल्या पोटच्या गोळ्याची वैरीणी कशी असू शकते हा प्रश्न अनेकांच्या मनात संताप आणत आहे. शुक्रवारी (ता. १३) आष्टी तालुक्यातील माणिकवाडा गावातील मध्य वस्तीत एक जिवंत अर्भक आढळून आल्याने चांगलीच खळबळ उडाली.
जन्म देणाऱ्या कुमारी मातेने हे अर्भक एका पिशवीत टाकून उकिरड्यावर फेकले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून त्या नवजात अर्भकाला ताब्यात घेत रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले. पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवित अवघ्या एका तासात त्या अर्भकाच्या मातेला ताब्यात घेतले. आष्टी पोलिसांनी घटनेची नोंद केली असून तपास सुरू आहे. माणिकवाडा गावात मध्य वस्तीत एका घराच्या समोरील उकिरड्यावर एका बाळाच्या रडण्याचा आवाज येताच शेजारी धावून गेले. त्यांना पिशवीतून लहान बाळाचा आवाज येत असल्याचे दिसले. या घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली.
गावातील नागरिक जिवंत अर्भक पाहण्यासाठी आले. हे जिवंत अर्भक माणिकवाडा गावातील अविवाहित महिलेचे असावे असा अंदाज गावातील लोकांना आला. पहाटेच्या वेळी त्याअविवाहित महिलेने लहान बाळांना जन्म दिला. आपली बदनामी होईल या भीतीने तिने ते बाळ एका पिशवीत भरून फेकून दिले. घाई घाईत तिने केलेले कृत्य सकाळी उजेडात आले. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांना तासाभरात त्या कुमारी मातेला ताब्यात घेतले. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कुमारी मातेच्या प्रमाणात वाढ होत आहे.

आढळलेले अर्भक स्त्री लिंगी

पिशवीत भरून फेकलेले अर्भक स्त्रीलिंगी असल्याचे सांगण्यात येत आहे. महिला पोलिस कर्मचारी शारदा दाभाडे हिने त्या बाळाला ताब्यात घेऊन ठाणेदार बबन पुसाटे, विष्णू काळुसे, देवेंद्र गुजर यांनी संशयित आरोपीच्या घराजवळ पाहणी करून पुरावे गोळा केले. सुमारे तासाभरात कुमारी मातेला ताब्यात घेतले. तिला आणि बाळाला साहूर येथील आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टर तपासणी केल्यावर बाळ सुखरूप असल्याची पुष्टी मिळाली असून बाळाच्या डोक्याला किरकोळ मार लागला आहे. पुढील उपचारासाठी आरोपी महिला व अर्भक यांना वर्धा येथे पाठविण्यात आले आहे.

कुमारी मातेने बाळाला जन्म दिल्याची दुसरी घटना

जिल्ह्यात कुमारी मातेने बाळाला जन्म दिल्याची ही दुसरी घटना आहे. काही दिवसापूर्वी जिल्हा रुग्णालयात एका कुमारीकेने बाळाला जन्म दिला. त्यावेळी त्या बाळाला अवैधरीत्या दत्तक देण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, महिला व बालकल्याण विभागाच्या सतर्कतेने तो प्रयत्न फसला. वर्धेत असे प्रकार घडत असून यावर आळा घालण्याची मागणी होत आहे.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!