जनसूर्या मीडिया
राज्य परिवहन महामंडळाच्या फलटण आगाराच्या विविध बसेस ह्या शालेय ट्रिपसाठी सोडत असतात. सर्व शाळांसाठी राज्य परिवहन महामंडळाची बस म्हणजे खात्रीशीर पर्याय म्हणून त्यामधून प्रवास करीत असतात. फलटण तालुक्यातील राजाळे येथील श्री जानाई हायस्कुलच्या विद्यार्थी हे वार्षिक सहलीसाठी गणपतीपुळे, रत्नागिरी येथे गेले होते. तर जाताना सातारा जिल्ह्यातील औंध येथे पहिल्यांदा बस बंद पडली त्यानंतर रत्नागिरी येथे बस बंद पडली होती. त्यामुळे संपूर्ण सहलीचे वेळापत्रकच कोलमडले होते. त्यामुळे पालक सुद्धा चिंतेत पडले होती कि; आपले पाल्य हे एवढ्या लांब अडकून पडले आहेत.
नुकतीच अगदी काही दिवसांपूर्वी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन सुधाकर पाटील यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या फलटण आगारचा आढावा घेतला होता. त्यामध्ये सर्वसामान्य प्रवाशांना अडचण येईल अश्या बसेस लांब सोडू नका असे स्पष्ट निर्देश देण्यात आले होते. तरी सुद्धा फलटण आगाराच्या माध्यमातून लांबच्या अंतरासाठी नादुरुस्त बसेस पाठवण्यात येत आहेत. जर बस लांब पाठवायची आहे तर त्याची तपासणी फलटण आगारात होत नाही का ? लांब अंतराच्या ठिकाणी बस पाठवायची असेल तर इतर आगारातील चांगल्या बस उपलब्ध होत नाहीत का ? सातारा जिल्ह्यातील अधिकारी हे मुद्दामून फलटण आगाराकडे दुर्लक्ष करीत आहेत का ? असे प्रश्न सुद्धा सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये उपस्थित राहत आहेत.
सध्या शालेय सहलींचा हंगाम सुरू आहे. सहल म्हणजे शालेय मुलांना आनंद व विविध अनुभव देणारे साधन असते. श्रीमंतांची मुले त्यांच्या खासगी गाडीने कुठेही जाऊ शकतात पण गोरगरीब व सामान्य माणसाच्या मुलांना अल्प खर्चात फिरण्याचा आनंद मिळतो तो शालेय सहलीत. विविध गड किल्ले, समुद्र किनारे, लेण्या, विविध मंदिरे, प्राचीन इतिहास या सहलीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना अनुभवता येतो. या साठी शासकीय सर्व परवानग्या, विद्यार्थी विमा, पॉलिसी हे सोपस्कार पूर्ण करण्यासाठी शिक्षक धडपडत असतात जेणे करून सहलीचा आनंद मुलांना घेता यावा; हे सर्व करून सुद्धा जर सहलीच्या ठिकाणी गेल्यावर बस बंद पडत असतील तर याला नक्की कोण जबाबदार ? ज्या बस लांब जाऊ शकत नाहीत; त्या बसेसना लांब का पाठवले जाते ? असे प्रश्न सुद्धा उपस्थित राहत आहेत.
शासन सहल शासकीय वाहनाने म्हणजेच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसनेच नेण्यात यावी; यासाठी आग्रही असते. शासनाचे हे धोरण बरोबरच आहे. पण या सहलीसाठी दिल्या जाणाऱ्या एसटी बस गाड्या ह्या अतिशय निकृष्ट दर्जाच्या दिल्या जातात. त्या बसला धड काचा, खिडक्या, नीट नसतात. इंजिन मध्ये बिघाड असतो, घाट चढताना जीव मुठीत घेऊन विद्यार्थी व शिक्षक प्रवास करत असतात. गाडी बंद पडून तासन तास वाया जातात. त्यामुळं नियोजित ठिकाणे विद्यार्थ्यांना बघता येत नाहीत. इतर वेळी थोडा उशीर झाला तर एसटीचे अधिकारी शाळांना दंड लावतात. मग एसटीच्या चुकीमुळे सहलीचे नियोजन फसले तर याला जबाबदार कोण ? अशावेळी अधिकारी उडवा – उडवीची उत्तर देतात; आणि हाच अनुभव राजाळे येथील श्री जानाई हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय राजाळेचे सहलीच्या निमित्ताने आला होता; असे मत सहल प्रमुख नीलकंठ निंबाळकर यांनी व्यक्त केले.
Post Views: 10
Add Comment