महाराष्ट्र

अवघ्या २४ वर्षीय तरुणीने साताऱ्याचा न्यायाधीश धनंजय निकमची लाचखोरी समाजासमोर आणली..!

 बाकीच्या न्यायालयांमध्ये चाललंय काय?

सातारा – जनसूर्या मीडिया

तारीख पे तारीख पे तारीख हा एक डायलॉग एका चित्रपटामुळे प्रसिद्ध झाला. गेले अनेक वर्ष या डायलॉगची सातत्याने चर्चा असते. परंतु खरोखरच न्यायालयाच्या चकरा आणि तारखा न्यायासाठी आहेत का न्याय लांबवण्यासाठी आहेत?
असा प्रश्न प्रत्येकाला पडतो आणि त्यातच न्यायाधीशांच्या भोवती जे संशयाचे वार घोंगावत आहे, त्याला बळकटी मिळताना दिसून येते.
या देशात बहुसंख्यांक सांगतील तोच न्याय असे जाहीरपणे सांगणारा अलाहाबादचा न्यायाधीश असेल किंवा महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाच्या व कळीच्या मुद्द्यावर सातत्याने वेळ लांबवणारा सर्वोच्च न्यायालयाचा निवृत्त न्यायाधीश असेल आणि अगदी काल परवाचा साताऱ्याचा जिल्हा व सत्र न्यायालयाचा न्यायाधीश धनंजय निकम असेल, रामशास्त्री बाण्याची व ताठ कण्याची आजच्या काळात गरज असताना सामान्यांचा एकमेव विश्वास उरलेल्या न्यायालयांमधील न्यायाधीशांची तोंडे काळी का पडू लागलीत? हा प्रश्न सामान्यांना पडल्याशिवाय राहत नाही. जरी या अपवादात्मक घटना असल्या तरी प्रश्न मात्र उपस्थित होतोच!
न्यायालयात गेल्यानंतर आपल्याला नक्की न्याय मिळू शकेल असं वाटून, अनेक जण न्यायासाठी न्यायालयात जातात, मात्र तिथलाच न्यायाधीश जर लाचखोर असेल तर न्याय कसा मिळणार? साताऱ्यात आरोपीच्या मुलीने दाखवलेले धाडस अशा लाचखोर न्यायाधीशाला जनतेसमोर उघड करण्यात महत्त्वाचे ठरले आहे.
साताऱ्यात न्यायाधीश धनंजय निकम, माण तालुक्यातील दहिवडीचा मध्यस्थ आनंद खरात व व मुंबईतील वरळी येथे राहणारा किशोर खरात यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कसे पकडले त्याची अनेकांना उत्सुकता आहे, तर एका 24 वर्षीय तरुणीने दाखवलेले धाडस यासाठी महत्त्वाचे ठरले आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केलेली तरुणी ही खरंतर आरोपीची मुलगी आहे. तिचा वडील सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर अटक होऊन न्यायालयीन कोठडीत आहे. म्हणजे तेही प्रकरण काही साजूक नाही, परंतु आरोपीला शिक्षा द्यायच्या ऐवजी आरोपीच्या जामिनासाठी लाच मागणारा न्यायाधीश या आरोपीपेक्षा भयानक असू शकतो हे इथे महत्त्वाचे आहे.
आपल्या न्यायव्यवस्थेमध्ये शंभर अपराधी सुटले तरी चालतील, परंतु एक निरपराध चुकीच्या गोष्टीत अडकू नये म्हणून काही व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचाच हा भाग असावा, कारण एका आरोपीच्या जामीन्यासाठी न्यायाधीश जर लाच मागत असेल, तर खरोखरच जे आरोपी सुटले नाही पाहिजेत त्यांच्यासाठी हे न्यायाधीश कोणत्या थराला जात असतील याचा विचार केलेला बरा.
तर झाले असे की, न्यायालयीन कोठडीत असलेल्या वडिलांना जामीन मिळवण्यासाठी या तरुणीने प्रयत्न केला. तिच्या वडिलांचा जामीनाचा अर्ज बऱ्याच काळापासून कोर्टापुढे प्रलंबित होता. या दरम्यानच्या काळात आनंद खरात आणि किशोर खरात या मध्यस्थांनी न्यायाधीश धनंजय निकम याला लाच द्यावी लागेल आणि हे धनंजय निकम यांच सांगण्यावरून आम्ही करत आहोत, त्यासाठी पाच लाख रुपये लागतील असे या दोघांनी सांगितले
तरुणीला हे खरे वाटले नाही, पण तिने अशा प्रकारची न्यायव्यवस्था असेल, तर ती खोडलेलीच बरी म्हणून पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने याची पडताळणी केली, तेव्हा धनंजय निकम याच्यासाठी या दोघांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.. आणि पुढचा सापळा हा साताऱ्याच्याच कोर्टाच्या आवारात असलेल्या एका हॉटेलमध्ये रचला गेला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
आता साताऱ्याचा जिल्हा न्यायाधीश लाचखुरीत पकडल्यामुळे बाकीच्या न्यायालयामध्ये काय चालत असेल? असा प्रश्न लोकांना पडला नसेल तरच नवल. एकीकडे देशात आणि राज्यात फार वेगाने सगळीच परिस्थिती बदलत आहे. त्याला न्यायव्यवस्था देखील अपवाद राहणार नाही की काय अशी भीती लोकांमध्ये आहे.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!