वादाच्या कारणाबाबत पोलिसही अनभिज्ञ
बूलढाणा : जनसूर्या मीडिया
बुलढाणा जिल्ह्यातील धाड येथे शनिवारी रात्री महापुरुषाच्या पुतळ्याजवळ फटाके फोडण्यावरून दोन गटात वाद झाला. त्याचे पर्यवसान जाळपोळीत झाले. दंगेखोरांच्या एका गटाने या चौकात उभी १० वाहने जाळून टाकली
या दंगलीत १० ते १५ जण जखमी झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास एका गटाने छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके फोडल्यानंतर वाद झाला. त्यानंतर समाजकंटकांनी या भागातील दुकानांसमोरील वाहनांची जाळपोळ सुरू केल्याने दंगल उसळली. त्यात दुचाकी, आॅटाेरिक्षा अशी १० वाहने जाळून टाकण्यात आली. घटनेची माहिती मिळताच बुलडाणा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत दंगलखोर पसार झाले होते. याबाबत अपर पोलिस अधीक्षक महामुनी यांच्याशी संपर्क साधला असता धाड येथील घटनेबाबत अजून पूर्ण माहिती मिळाली नसल्याचे त्यांनी सांगितले.
बुलडाणा जिल्ह्यात पाचच दिवसांत दुसरी दंगल
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर पाचच दिवसांत बुलडाणा जिल्ह्यात झालेली ही दुसरी दंगल आहे. यापूर्वी मेहकर शहरातील माळी पेठजवळ २५ नोव्हेंबर रोजी चारचाकी, दुचाकी व ऑटो जाळल्याची घटना घडली होती. दोन राजकीय पक्षांच्या वादातून ही दंगल घडली होती. आता शनिवारी धाड येथे घडलेल्या दंगलीमागे दोन समाजातील तेढ आहे की राजकीय कारणामुळे हा हिंसाचार झाला, याची चौकशी केली जात आहे. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी कुणालाही अटक करण्यात आली नव्हती. अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
Post Views: 17
Add Comment