विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी जाहीर झाले. या निवडणुकीत महायुतीने दणदणीत विजय मिळवला आहे. त्यातच आता एकूण ९५ मतदारसंघांमध्ये मतदान आणि मतमोजणी यामध्ये तफावत आल्याचे समोर आले आहे.
त्यामुळे हा वाद चिघळण्याची शक्यता आहे.
राज्यातील २८८ जागांसाठी २० नोव्हेंबरला मतदान झाले. या निवडणुकीत ६६ .०५ टक्के एवढे साधारणपणे गेल्या ३० वर्षांतील विक्रमी मतदान झाले. त्यामुळे जनतेचा कौल कोणाला मिळतो याबाबत उत्सुकता होती. त्यानुसार मतदारांनी महायुतीला भरभरून मते दिल्याने महायुतीने २३० जागा जिंकल्या.
तर, महाविकास आघाडी केवळ ४६ जागांवर मर्यादित राहिली. हा निकाल अविश्वसनीय असल्याची प्रतिक्रिया महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिली आहे. त्यातच आता ईव्हीएमबद्दलचा संशय निर्माण करणारी आकडेवारीही समोर आली आहे. एकूण २८८ पैकी १९३ मतदारसंघांमध्ये प्रत्यक्षात झालेले मतदान आणि मतमोजणीचा आकडा जुळला आहे.
मात्र, उर्वरित ९५ मतदारसंघ असे आहेत की, मतदान आणि मतमोजणीत तफावत आढळली आहे. त्यापैकी १९ मतदारसंघांमध्ये ईव्हीएममध्ये जास्त मतांची नोंद झाल्याचे आढळले. तर, ७६ मतदारसंघांमध्ये प्रत्यक्ष मतदानाच्या तुलनेत ईव्हीएममध्ये कमी मतांची नोंद झाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे आता विरोधक आक्रमक होण्याची चिन्हे आहेत. परिणामी ईव्हीएमवरून पुन्हा एकदा वादंग निर्माण होऊ शकतो.
आमगाव, उमरखेड, लोहा, औरंगाबाद पूर्व, भोसरी, परळी, देगलूर, हिंगोली, वैजापूर, कळवण, चांदवड, दिंडोरी, कागल, बोईसर, कोल्हापूर दक्षिण, हातकणंगले, करमाळा, सोलापूर दक्षिण आणि मालेगाव मध्य या १९ मतदारसंघांमध्ये मतदानाच्या तुलनेते जास्त मते आढळली.
Add Comment