संपादकीय
स्वतंत्र भारताच्या इतिहासात २६ नोव्हेंबरचे विशेष महत्त्व आहे. कारण या दिवशी १९४९ मध्ये भारतीय राज्यघटना स्वीकारण्यात आली आणि २६ जानेवारी १९५० रोजी अंमलबजावणी झाली. संविधान निर्मात्यांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी आणि संवैधानिक मूल्यांबद्दल नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी २६ नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून साजरा केला जातो.
आपल्या संविधानातील मूल्ये, तत्त्वे आणि आदर्श यांचे महत्त्व स्पष्ट करण्यासाठी संविधान दिन साजरा केला जातो. या दिवशी देशातील सर्व नागरिक संविधान निर्मितीत योगदान देणाऱ्या सर्व महान व्यक्तींचे स्मरण करतात. संविधान दिन लोकांना संविधानाविषयी जागरूक होण्यासाठी आणि त्यांच्या अधिकारांचा वापर करण्यासाठी प्रेरित करतो. संविधान दिनामुळे लोकशाही बळकट होण्यास आणि संवैधानिक मूल्ये जपण्यास मदत होते.
भारतीय संविधानाचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने दरवर्षी संविधान दिनानिमित्त विविध प्रकारचे कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन केले जाते. भारतीय संविधान दिनानिमित्त शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये आणि इतर सार्वजनिक ठिकाणी संविधानाविषयी जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
भारतीय संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला स्वतंत्र भारतात राहण्याचा समान अधिकार दिला आहे. संविधान तयार करण्यासाठी सुमारे २ वर्षे, ११ महिने आणि १७ दिवस लागले. भारतीय राज्यघटना लागू झाली तेव्हा त्यात ३९५ कलमे, ८ अनुसूची आणि २२ भाग होते. सध्या यात ४४८ कलमे, २५ भाग आणि १२ अनुसूची आहेत. या दिवशी संविधानाचे महत्त्व लोकांना समजावे यासाठी व्याख्याने, परिसंवाद, प्रश्नमंजुषा स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, भाषण स्पर्धा आणि रॅलीचे आयोजन केले जाते.
तसेच संविधान दिनानिमित्त केंद्र व राज्य शासनातर्फे विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या दरम्यान संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले जाते. भारताचे संविधान हे जगातील सर्वात लांब लिखित संविधान आहे. त्याचे बरेच भाग युनायटेड स्टेट्स, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, युनायटेड किंगडम, जर्मनी, आयर्लंड, सोव्हिएत युनियन आणि जपानच्या संविधानांमधून घेतले गेले आहेत.
भारतात आजही अनेक संविधानाचे शत्रू राहतात. हे लोक दंगली घडवून, जातीपातीत भांडणे लावून, अल्पसंख्यांकांचे लांगुलचालन करुन, डीप स्टेट कृत्ये राबवून संविधान धोक्यात आणण्याचा प्रयत्न करतात. आपण सर्वांनी सावध होऊन लोकशाही आणि संवैधानिक मार्गाने या संविधानाच्या शत्रूंचा सामना करायला हवा!
Post Views: 14
Add Comment