क्राईम

मांत्रिकाच्या सांगण्यावरून आईनेच मुलीचं हृदय भाजून खाल्लं, नग्न होऊन डान्सही केला

अंधश्रेद्धेच्या नादात गरिबी दूर करण्यासाठी आईने केले भयानक कृत्य

जनसूर्या मीडिया

गरिबी माणसाला काहीही करायला भाग पाडते. तिथे आईची मायाही कामी येत नाही, अशी हृदय पिळवटून टाकणारी एक घटना झारखंडमध्ये घडली आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आईनं भोंदूबाबाच्या सांगण्यावरून लेकीचा बळी दिला आहे. इतकंच नाही तर निर्वस्त्र होऊन त्या ठिकाणी नृत्यही केलं. पोलिसांनी महिलेला अटक केली असून तिला सल्ला देणाऱ्या मांत्रिकाचा पोलीस शोध घेत आहेत.
एकीकडे भारताची विकसित देश होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे, तर दुसरीकडे गरिबीच्या गर्तेत अडकलेले नागरिक नको त्या गोष्टींना बळी पडत असल्याचं चित्र दिसत आहे. झारखंडमधल्या पलामू इथं एका महिलेनं कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी स्वतःच्या दीड वर्षांच्या मुलीचा बळी दिलाय. मांत्रिकाच्या बोलण्यावर विश्वास ठेवून महिला अंधश्रद्धेला बळी पडली आणि तिने मुलीला मारून तिचं हृदय शिजवून खाल्लं तसंच प्रसाद म्हणून मांत्रिकालाही दिलं.
पलामू येथील हुसैनाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खडारपर गावात ही मन विषण्ण करणारी घटना घडली आहे. या गावात जेमतेम 50 घरं आहेत. त्यात दलित कुटुंबांची संख्या अधिक आहे. तिथेच अरुण राम नावाच्या व्यक्तीचं घर आहे. तो दिल्लीमध्ये काम करतो. त्याची पत्नी 35 वर्षीय गीता देवी तिची सासू कौशल्या देवी आणि चार मुलींसह गावात राहत होती.
बिहारमधील सासाराम येथे राहणारा मांत्रिक गीताच्या गावात फिरून घरोघरी जाऊन त्याच्या तंत्र-मंत्र विद्येबाबत लोकांना सांगायचा. त्याच्याच बोलण्याला गीता देवी फसली आणि तिनं गरिबीतून सुटका करून घेण्यासाठी अंधश्रद्धेची मदत घेतली. ही घटना 12 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री घडली. त्या दिवशी जपला बाजारात जात असल्याचं सासूला सांगून गीता देवी मुलीला घेऊन घरातून निघाली. मात्र मध्यरात्र उलटून गेली तरी ती घरी आली नाही. अचानक निर्वस्त्र होऊन ती घरी पोहोचली. तिची अवस्था पाहून नातेवाईकांना काहीतरी भयंकर घडल्याची शंका आली. तिला कपडे घालून तिच्याकडून त्यांनी सगळी माहिती घेतली, तेव्हा तिनं मुलीचा बळी दिल्याचं सांगितलं. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली असून त्यानंतर तिनं असा दावा केला की पोलिसांनी पकडलं नसतं तर दुसऱ्या दिवशी तिनं मुलीला पुन्हा जिवंत केलं असतं.
मांत्रिकाच्या सांगण्यावरून तिनं बळी दिलेल्या ठिकाणी निर्वस्त्र होऊन नाच केला. तिला वाटलं यामुळे तिला सिद्धी प्राप्त होतील. त्यामुळे तिच्या घरची आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल. पोलीस आता त्या मांत्रिकाच्या शोधात आहेत. त्याला अटक करण्यासाठी पोलीस छापेमारी करत आहेत. गरिबी, अज्ञान, अंधश्रद्धेवर विश्वास यामुळे समाजात अशा घटना अजूनही घडत आहेत.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!