४५ इसमांविरोधात गुन्हा दाखल ; ४ जण अटकेत
अमरावती प्रतिनिधी –
निवडणूक प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस असून २० नोव्हेंबरला एकाच टप्प्यात निवडणुका पार पडणार आहेत. याच पार्श्वभूमीवर पक्षांकडून सभा आणि प्रचाराचा सपाटा सुरु आहे. दरम्यान, प्रचार सभेसाठी गेलेल्या भाजपा महिला नेत्यावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भाजपाच्या माजी खासदार नेत्या नवनीत राणा यांच्यावर मुस्लीम समाजाच्या लोकांकडून हल्ला करण्यात आला. सभेदरम्यान अल्ला हू अकबरचे नारे, घाणेरडे इशारे, थुंकण्याचा प्रयत्न केला गेल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला आहे.
अमरावतीच्या दर्यापूरमधील खल्लार गावात हा प्रकार घडला. युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार रमेश बुंदीले यांच्या प्रचारासाठी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सभेदरम्यान मुस्लीम समाजाच्या लोकांनी शिरकाव करत खुर्च्या फेकून मारल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला.
या प्रकरणी बोलताना नवनीत राणा म्हणाल्या, मला पाहून त्या लोकांनी शिवीगाळ केली. माझ्या पोलीस सुरक्षा रक्षकांना देखील मारहाण झाली. मला त्यांनी मारेल, माझ्या अंगावर त्यांनी खुर्च्या फेकल्या. माझ्या जातीवर त्यांनी शिवीगाळ केली. माझ्यावर थुंकण्याचा प्रयत्न झाला. आरोपींना जर अटक झाली नाही तर अमरावती जिल्ह्यातील सगळा हिंदू समाज या ठिकाणी एकत्र येईल, असे नवनीत राणा म्हणाल्या आहेत. या प्रकरणी नवनीत राणा यांनी खल्लार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.
दरम्यान, तक्रारीवरून आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे खल्लार पोलीस ठाण्याचे ठाणेदार राहुल जंजाळ यांनी सांगितले. ४५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे, असे पोलिसांनी सांगितले.
Post Views: 20
Add Comment