संपादकीय

मतदारांकडे निवडणुकीतील गैरप्रकारावर आळा घालण्यासाठी सी-व्हीजील नावाचे शस्त्र…

उमेदवार पैसे, वस्तू वाटप करत असेल तर तक्रार करा. निर्धारित वेळेनंतर प्रचार करत असेल तर तक्रार करा. निवडणूक प्रक्रियेशी संबंधित गैरप्रकार सुरू आहे सी-व्हीजील (cVIGIL App) मोबाईल उघडा तक्रार करा.
लाऊडस्पीकरचा आवाज मर्यादेचे उल्लंघन झाल्यास तक्रार करा, जातीय व्देषयुक्त भाषण आढळल्यास, अवैध मद्य वाटप किंवा वाहतूक, परवानगीशिवाय बॅनर किंवा पोस्टर लावल्यास, पेड न्यूज-फेक न्यूज आढळून आल्यास, बंदुक दाखवणे किंवा धमकावणे आणि प्रलोभन दाखवणे अशा घटनांविरोधात तक्रार नोंदवण्यासाठी नागरिकांनी या ॲपचा वापर करणे अपेक्षित आहे. निवडणुका निर्विघ्न व शांततेत पार पाडण्यासाठी सी-व्हीजील ॲप खऱ्या अर्थाने नागरिकांच्या हाती दिलेले लोकशाहीचे प्रभावी शस्त्रच आहे.
आपण दररोज मोबाईलवर अनेक ॲप्सचा वापर करीत असतोच. यात हे एक ॲप प्रत्येकाने मोबाईलमध्ये डाऊनलोड करून ठेवावे. अगदी एका मिनीटात आपणाला निवडणूक काळात सुरू असलेल्या गैर प्रकारांबाबत तक्रार नोंदवता येईल. गैरप्रकारांबाबत फोटो, व्हिडिओ काढा आणि ॲपवर (cVIGIL App) अपलोड करा. तुमच्या पाठविलेल्या माहितीवरून तक्रारीबाबतचा ठावठिकाणा शोधला जाईल. तक्रार केल्यानंतर अगदी १०० मिनिटांत निवडणूक आयोगाचं फिरतं भरारी पथक घटनास्थळी पोहोचून तुमच्या तक्रारींचे निवारण करेल. विशेष म्हणजे आपण दिलेली माहिती व आपले नाव गोपनीय ठेवण्यात येणार आहे. नागरिक निनावी तक्रारी देखील नोंदवू शकतात. तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन मतदार आणि राजकीय पक्षांना सुविधा देण्यासाठी आयोगाने तयार केलेल्या ॲप्सपैकी हे एक ॲप आहे.
निवडणूक प्रक्रियेतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी तसेच स्वच्छ निवडणूक प्रक्रियेची अंमलबजावणी करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या सोबतीला नागरिकही मोठ्या प्रमाणात सहभागी होणे गरजेचे आहे. त्यामुळे आयोगाने तयार केलेल्या सी-व्हीजील ॲप प्रत्येक मतदाराच्या मोबाईलमध्ये असणे आवश्यक आहे. सी व्हिजील’ अ‍ॅप या गैरप्रकारांवर निर्बंध घालू शकते. आयोगाने नेमलेली यंत्रणा प्रत्यक्ष फिरत्या पथकांद्वारे आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी कार्य करीत असते. परंतू छुप्या मार्गाने आचारसंहितेचा भंग होत असल्यास त्यावरही आळा घालण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करून सी व्हीजील ॲपद्वारे प्रचारांवर करडी नजर ठेवण्याचे आवाहनही वेळोवेळी आयोगाकडून करण्यात येत आहे.
सी व्हिजील ॲप कसं काम करतं? तर यात वापरकर्त्याला निवडणुकीदरम्यानच्या गैरप्रकाराचा फोटो काढून किंवा दोन मिनिटांचा व्हिडीओ रेकॉर्ड करून ॲपवर (cVIGIL App) अपलोड करावा लागेल. यानंतर मोबाईल ऑटोमेटीक त्या स्थळाचा शोध घेईल. तक्रार पाठविल्यवर एक युनिक आयडी मिळेल. तक्रार केल्यानंतर, माहिती जिल्हा नियंत्रण कक्षापर्यंत पोहोचते आणि लगेच एक फिरते पथक यासाठी नियुक्त केले जाते. ज्यामध्ये फ्लाइंग स्क्वॉड आणि पाळत ठेवणाऱ्या पथकांचा समावेश आहे. संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांकडे सी व्हीजील इव्हेंस्टर नावाचं मोबाइल ॲप असतं, ज्यातून त्यांना त्या त्या तक्रारींबाबत माहिती मिळत असते. एकदा फील्ड युनिटने तक्रारीला प्रतिसाद दिल्यानंतर आयोगाच्या राष्ट्रीय तक्रार पोर्टलवर पाठवली जाते आणि नागरिकांना १०० मिनिटांत परिस्थितीची माहिती दिली जाते आणि त्यावर योग्य ती कारवाई केली जाते.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!