सहकार विभागाच्या छाप्यात सावकाराच्या घरातून ३८ कागदपत्रे जप्त
अकोला – प्रतिनिधी
सावकारीत पचवलेल्या शेतीचा ताबा सोडण्यास नकार देणाऱ्या शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न झाला होता. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात हा प्रकार घडला होता. या प्रकरणानंतर राज्य सरकारवर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी टीका करत कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर सावकार मनोहर शेळकेच्या तेल्हारा तालुक्यातील भांबेरी गावातल्या घरावर सहकार विभागाने छापे टाकले असून जवळपास ३८ कागदपत्र जप्त केली आहेत.
२८ मे रोजी सकाळी ६ पासून या ठिकाणी छापेमारी सुरू झाली होती. त्यानंतर दुपारी २ वाजेपर्यंत शेळके यांची निवासस्थावावर चौकशी सुरू होती. तपासणी दरम्यान जिल्हा उपनिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी ६ खरेदी कागदपत्रे आणि झेरॉक्स प्रती ३, बँक पासबुक १७, चेक बूक २, खुले धनादेश २, सोबतच दोन ईसार पावत्या, कोरे स्टॅम्प १ याशिवाय इतर काही प्रॉपर्टी ५ कागदपत्रे असे एक एकत्रित ३८ कागदपत्र शेळके यांच्या निवासस्थावरुन जप्त करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधकारी प्रवीण लोखंडे यांनी दिली.
दरम्यान मनब्दा गावातील हरिभाऊ गतमणे या शेतकऱ्याची चार एकर शेती सावकाराने पचवल्याचा आरोप त्यांनी केला होता. पैसे परत केल्यानंतरही शेतीचा शेळके आणि भोजने यांनी ताबा घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी शेतकरी गतमणे यांचा मुलगा संदीपला १७ मे रोजी शेतातच चाकाखाली चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर वृद्ध शेतकरी हरिभाऊ गतमणेंवर प्राणघातक हल्ला देखील चढविला होता. याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या प्रकरणी सावकार मनोहर शेळकेच्या दोन मुलांसह चौघांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.
त्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी एक्सवर प्रतिक्रिया दिली होती. सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न हा राज्यातील कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणारा आणि थरकाप उडवणारा प्रसंग आहे. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात असलेल्या मनब्दा या गावी एका अवैध सावकाराच्या गुंडाणे शेतकऱ्यावर प्राणघात हल्ला करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. एवढ्यावरच हे गुंड थांबले नसून संबंधित शेतकऱ्याच्या शेतात जाऊन शेताचा ताबा घेण्याचासुद्धा प्रयत्न केला.
शेतकरी आणि त्याच्या परिवाराने विरोध केला असता त्यांना ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न या गावगुंडातर्फे करण्यात आला. संबंधित शेतकऱ्याच्या वृद्ध वडिलाला व पत्नीलासुद्धा मारहाण करण्यात आली. महायुती सरकारच्या काळात अवैध सावकारीने पुन्हा डोके वर काढले असून ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न अवैध सावकारांकडून होत आहे. शेतकऱ्यांचा सूड घेणाऱ्या अवैध सावकारांवर सरकारने कडक कारवाई करावी. अशी मागणी त्यांनी केली होती.
Post Views: 76
Add Comment