जनसूर्या मीडिया
देशात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. या घडीला देशात निवडणुकीचे वातावरण आहे. परंतु, काश्मिरात दहशतवाद्यांचा उच्छाद काही कमी झालेला नाही.
दहशतवादी हल्ल्याने काश्मीर पुन्हा हादरलं आहे. शनिवारी सायंकाळी येथे एका पाठोपाठ दोन दहशतवादी हल्ले झाले. निवडणुकीच्या दोन दिवस आधीच हा हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे. शोपियानच्या हिरपोरा भागात दहशतवाद्यांनी भारतीय जनता पार्टीच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या केली. तर दुसऱ्या हल्ल्यात एका जोडप्यावर गोळीबार केला. यात दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
राजस्थानातील जयपूर येथून अनंतनाग जिल्ह्यातील हिरपोरा भागात आलेल्या जोडप्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले. पहलगाम येथील एका तंबूत ते थांबले होते. तंबूतून बाहेर येताच दहशतवाद्यांना त्यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात एका जणाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. या घटनेनंतर पोलिसांनी परिसराची नाकाबंदी केल्याचे सांगण्यात आले.
या हल्ल्यानंतर काही वेळातच दुसरा हल्ला झाला. रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास हा हल्ला झाला. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी माजी सरपंच एजाज शेख यांची हत्या केली. या हल्ल्यानंतर अनंतनाग आणि शोपियान भागात नाकाबंदी करण्यात आली आहे. या हल्लेखोरांना पकडण्यासाठी शोधमोहिम राबवण्यात येत आहे. या हल्लेखोरांना पकडले की नाही याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
Post Views: 81
Add Comment