मुंबई

मिहिर कोटेच्या प्रचार रॅलीत दगळफेक ; अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

मुंबई जनसूर्या मीडिया –

आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मुंबईतील प्रचार शिगेला पोहचलेला आहे. त्यातच ईशान्य मुंबई मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. गोवंडी परिसरात हा प्रकार घडला. अज्ञातांकडून प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप भाजपा पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला असून याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या घटनेवर महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा म्हणाले की, देवनार-गोवंडी परिसरात आमचा प्रचार सुरू असताना तिसऱ्यांदा आमच्या प्रचार फेरीवर दगडफेक करण्यात आली आहे. विरोधी पक्षाचे उमेदवार पराभवाच्या भीतीपोटी अशाप्रकारे धंदे करतायेत असं मला वाटते. या प्रकारानं महायुतीचे कार्यकर्ते दगडफेकीने घाबरून जातील आणि प्रचार करणार नाहीत असं वाटत असेल पण ते होणार नाही. आमच्या महिला पदाधिकारी निहारिका खोंदले ज्यांच्या तोंडावर दगड लागला, तिथे गुन्हा नोंद करण्यात येत आहे. विरोधकांकडे समाजकंटक असून हे प्रकार करत आहेत. या प्रकारामुळे आम्ही घाबरणार नाही आणि थांबणारही नाही असं त्यांनी सांगितले.
तर आमच्या प्रचार रॅलीला प्रचंड प्रतिसाद मिळतोय. सोमवारी संध्याकाळी मानखुर्द गोवंडी परिसरातून ही प्रचार रॅली निघाली होती. तेव्हा गोवंडीत आमच्यावर दगडफेक करण्यात आली. तो दगड मला लागला. विरोधकांची ही कटकारस्थाने आहेत. हे कमकुवतपणाचं लक्षण आहे. भाजपा उमेदवाराला वाढता प्रतिसाद पाहून हे घाबरले आहेत. हे भेकड प्रकार असून त्यातूनच विरोधकांची हार झाली आहे असं भाजपा महिला पदाधिकारी निहारिका खोंदले यांनी म्हटलं.
ईशान्य मुंबई येथे महायुतीकडून मिहिर कोटेचा तर महाविकास आघाडीकडून संजय दीना पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या मतदारसंघात विद्यमान खासदार मनोज कोटक यांचं तिकिट कापून मिहिर कोटेचा यांना उमेदवारी देण्यात आली. याठिकाणी उबाठा गटाकडून संजय दीना पाटील यांना तिकिट मिळाले आहे. त्यामुळे महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना या मतदारसंघात होत आहे. तर नुकतेच समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी यांनी उबाठा गटाचे उमेदवार संजय दीना पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!