महाराष्ट्र

फिर्याद रिक्षाचालकांच्या खुनाची, पण पोलीस तपासात आढळले वेगळेच तथ्य

हिंजवडी –

पार्क केलेल्या दुचाकीला रिक्षाची धडक लागून महिला खाली पडली. या कारणावरून महिलेने रिक्षा चालकासोबत भांडण केले. त्‍यानंतर रिक्षाचालकाचा मृतदेह आढळून आला. याबाबत मयत रिक्षा चालकाच्‍या भावाने खून झाल्‍याची फिर्याद दिली. मात्र पोलीस तपासात हा अपघात असल्‍याचे समोर आले आहे. ही घटना शनिवारी (दि. ३०) सायंकाळी बावधन येथे घडली.
रिझवान यासीन मणियार (वय ३४) असे मृत रिक्षा चालकाचे नाव आहे. फरमान यासीन मनियार (वय ३०, रा. सुसगाव, ता. मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्‍यानुसार ३० ते ३२ वर्षीय महिला व तिचा साथीदार (नाव, पत्‍ता माहिती नाही) यांच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल केला आहे.
पोलीस उपायुक्‍त बापू बांगर यांनी दिलेल्‍या माहितीनुसार, बावधन येथे शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्‍या सुमारास मयत तरुण रिझवान याच्‍या रिक्षाचा पार्क केलेल्‍या दुचाकींना धक्‍का लागल्‍याने मयत रिझवान आणि ३० ते ३२ वयाच्या मराठीमध्ये बोलणाऱ्या अनोळखी महिलेसोबत वाद झाला. त्‍यानंतर तिने तिचा पती किंवा नातेवाईक यांना बोलावून घेतले. आरोपींनी फिर्यादी यांचा भाऊ रिझवान यास कानाखाली मारले.
या घटनेनंतर रिझवान याचा मृतदेह आढळून आला. रिझवान याला मारहाण केली तसेच गुप्तांगांमध्ये शस्त्र खुपसून खून केला असे प्रथमदर्शनी वाटल्‍याने पोलिसांनी खुनाचा गुन्‍हा दाखल केला. पोलिसांनी सुरुवातीला खुनाच्या अनुषंगाने तपास सुरु केला.
मात्र पोलीस तपासात हा खून नसून अपघात असल्‍याचे दिसून आले आहे. मयत रिझवान यांच्‍या गुप्‍तांगामध्‍ये शस्‍त्राचा वार नसल्‍याचे शवविच्‍छेदन अहवालातून दिसून आले. त्‍यामुळे पोलिसांच्‍या तपासाची दिशा बदलण्‍यात आली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!