यवतमाळ प्रतिनिधी
यवतमाळमध्ये चार्जिंगला लावलेल्या इन्व्हर्टर बॅटरीचा स्फोट झाल्याने मॅकेनिक जागीच ठार झाला आहे. ही घटना आर्णी शहरातील माहूर चौकात गुरुवारी (२८ मार्च २०२४) पहाटेच्या सुमारास घडली. बॅटरीचा स्फोट इतका भीषण होता की, मॅकेनिक काही फूट अंतरापर्यंत फेकला गेला. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.
मिळालेल्या माहितीनुसार, तस्किल शेख वकील (वय, ३५) असे इन्व्हर्टर बॅटरीचा स्फोटात ठार झालेल्या मॅकेनिकचे नाव आहे. तस्किल हा गेल्या अनेक वर्षांपासून इन्व्हर्टर बॅटरी दुरूस्तीचे काम करीत होता. रमजान महिना असल्याने तस्कीलने रोजा ठेवला होता. यामुळे गुरुवारी पहाटे तीन वाजता रोजा सोडण्यासाठी उठला. त्यानंतर दुरूस्तीसाठी आलेली इन्व्हर्टर बॅटरी बनवण्यासाठी माहूर येथील दुकानाकडे निघाला. मात्र, दुकान उघडताच काही क्षणातच इन्व्हर्टर बॅटरीचा स्फोट झाला. या स्फोटात तस्किल गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी पहाटे त्यांना मोठा आवाज ऐकू आला. हा आवाज नेमका कशाचा आहे, हे पाहण्यासाठी नागरिक घराबाहेर पडले. त्यावेळी त्यांना तस्किल जखमी अवस्थेत जमीनीवर पडल्याचे दिसला. यानंतर त्यांनी त्वरीत स्थानिक पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तस्किलला रुग्णालयात दाखल केले. परंतु, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी चौकशी केली असता इन्व्हर्टर बॅटरीचा स्फोट झाल्याने तस्किलचा मृत्यू झाल्याचे समोर आले. या घटनेने आर्णी शहरात एकच खळबळ माजली.
Post Views: 75
Add Comment