पंचवटी पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल, तपास सुरु
नाशिक : जनसूर्या मीडिया
हिरावाडीत राहणाऱ्या युवकाने नंदूरबार जिल्ह्यातील कथित मुलीशी विवाह केला. युवक व त्याची आई भाजीपाला खरेदीसाठी मार्केटमध्ये गेले असता, कथित पत्नीने तिच्या साथीदारांसह घरातील १० लाखांचे सोन्याचे दागिने, रोकड, लग्नासाठी दिलेली रक्कमेसह सुमारे ११ लाख ६० हजार रुपये घेऊन पसार झाली आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस संशयितांचा शोध घेत आहेत.
हिंमत उर्फ आकाश पावरा ( रा. नवागाव पिंपरी, ता. शहादा, जि. नंदूरबार), दीपक पटेल, राहुल पटेल, पूजा पटेल (रा. करण चौफुली, ता.जि. नंदूरबार. मूळ रा. तोरणमाळ, ता. धडगाव, जि. नंदूरबार) अशी संशयितांची नावे आहेत. परंतु ही नावे खरी असण्याची शक्यता नाही.
प्रफुल्ल शांताराम भिडे (४५, रा. अण्णाज् व्हिला, गायत्रीनगर, हिरावाडी) यांच्या फिर्यादीनुसार, कामकाजाच्या माध्यमातून त्यांची संशयित हिंमत पावरा याच्याशी ओळख झाली असता त्यांनी लग्नासाठी मुलगी असल्यास सांगा, असे सांगितले. त्यानुसार, पावरा याने त्यांना करण चौफुली येथे एक मुलगी असल्याचे कळविले. त्यामुळे ८ मार्च रोजी भिडे हे मुलगी पाहण्यासाठी करण चौफुली (नंदूरबार) येथे गेले. त्यावेळी पावरा याने मुलीचे भाऊ दीपक पटेल व राहुल पटेल यांची भेट घालून दिली. त्यानंतर मुलगी पाहण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर संशयित राहुल व दीपक यांनी लग्नापूर्वी दीड लाख रुपये देण्याची अट घातली.
भिडे यांच्याकडे रोख पैसे नसल्याने त्याने तेथेच तीन दिवस थांबून एटीएममधून काढून ५० हजार संशयितांना दिले. त्यानंतर संशयितांनी पावरा चालीरितीनुसार त्यांचा पूजा पटेल हिच्याशी विवाह लावून दिला. भिडे, नववधू पूजा व तिचा भाऊ राहुल हे नाशिकला हिरावाडीत आले. घरी आल्यानंतर ८० हजार पटेल यास दिले. उर्वरित २० हजार रुपये कोर्टमॅरेजनंतर देण्याचे ठरले. राहुल पटेल संशयित पूजा हिचे कागदपत्रे घेण्यासाठी पुन्हा करण चौफुली जात असल्याचे सांगून गेला.
२० तोळे दागिन्यांसह नववधू पसार
दरम्यान, बुधवारी (ता. २०) सकाळी भिडे व त्यांची आई हे दोघे भाजीपाला खरेदीसाठी मार्केट गेले. त्यावेळी पूजा पटेल घरात एकटीच होती. मार्केटमधून दोघे परत आले असता, पूजा पटेल घरात नव्हती. तसेच घरातील सामानही अस्ताव्यस्त होते. देवघरातील १० लाख ३० हजारांचे २० तोळे सोन्याचे दागिने, कपाटातील रोकड, दोन मोबाईल व आगाऊ दिलेले १ लाख ३० हजार रुपये असे ११ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक उपनिरीक्षक वनवे हे करीत आहेत.
Post Views: 113
Add Comment