कानपूर – जनसूर्या मीडिया
नवरा बायकोमध्ये लहान-मोठे खटके उडतातच. काहीवेळा त्यांच्यात एवढे टोकाचे वाद होतात की, गोष्ट घटस्फोटावर जाते. परंतु एका नवरा-बायकोमध्ये तर असा वाद झाला की, नवऱ्याने बायकोचं थेट निलंबन केलं.
ही बायको एका शाळेची मुख्याध्यापिका होती. नवऱ्याने तिची RTIकडे माहिती मागितली आणि त्याच आधारावर तक्रार करून तिचं निलंबन घडवून आणलं. असं नेमकं काय घडलं की नवऱ्याला बायकोची प्रगती बघवली नाही.
जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांकडे या मुख्याध्यापिकेविरोधात तक्रार आली होती. मुख्याध्यापिका मॅडम कायम शाळेला टाळं लावून कुठेतरी जातात, असं या तक्रारीत म्हटलं होतं. याचा गंभीर परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होतोय, असा आरोप मुख्याध्यापिकेविरोधात तक्रारीत केला होता. RTI च्या अहवालात हे सर्व आरोप खरे ठरल्यानंतर जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापिकेला निलंबित केलं. विशेष म्हणजे तिच्या विरोधात तक्रार करणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नव्हती तर तिचा नवराच होता.
नेमकं प्रकरण काय?
प्रकरण आहे उत्तर प्रदेशातील कानपूरचं. इथल्या जलेसर भागातील रहिवासी मनीष कुमार वकील आहे. तर, त्याची पत्नी विनाक्षी ही कानपूरमधील सपई गावातील शाळेत मुख्याध्यापिका होती. विशेष म्हणजे या पूर्ण शाळेचा कारभार ती एकटीच सांभाळत होती.
शाळेत एकच शिक्षिका आहे, त्यात ती कधीही शाळेला टाळं लावून गायब होते, अशी तक्रार काही दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांच्या पालकांनी विनाक्षीविरोधात केली होती. त्यानंतर विनाक्षीला ‘पुन्हा असं आढळल्यास पगार कापला जाईल’, अशी तंबी वरिष्ठांकडून मिळाली. याबाबत कळताच तिच्या नवऱ्याला प्रचंड राग आला. आपली बायको खरोखर शाळा बंद करून कुठेतरी जाते का, नेमकी कुठे जाते, अशी संशयाची पाल त्याच्या मनात चूकचूकली. मग त्यानं तिच्याविरोधात थेट जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आणि तिची RTI चौकशी करण्याची मागणी केली. त्यानंतर अखेर ती खरोखर शाळा बंद करून कुठेतरी जाते हे आढळलंं आणि तिचं निलंबन झालं. आता हे प्रकरण जिल्ह्याभरात चांगलंच चर्चेत आहे.
Post Views: 70
Add Comment