पुणे – जनसूर्या मीडिया
खाऊ देण्याच्या बहाण्याने एका सहा वर्षाच्या मुलीला रिक्षात बोलावून घेत तिच्यासोबत अश्लील चाळे केल्याचा प्रकार पुण्यातील पर्वती परिसरात घडला आहे. हा प्रकार मागील आठ ते दहा दिवसांपूर्वी पीडित मुलगी राहत असलेल्या सोसायटीच्या पार्किंगमधील रिक्षात घडला आहे. याप्रकरणी पर्वती पोलिसांनी एकावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पीडीत मुलीच्या आईने बुधवारी (दि.१३) पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून कमलेश गणेश खराटे याच्यावर आयपीसी ३५४ सह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी एकाच परिसरात राहतात. आरोपीने फिर्यादी यांच्या सात वर्षाच्या मुलाला खाऊ देतो असे सांगितले. तसेच सहा वर्षाच्या मुलीला रिक्षात बोलावून घेऊन तिला पेप्सी व बॉबी खायला दिली.
आरोपीने फिर्यादी यांच्या मुलीला मांडीवर बसवुन तिच्यासोबत गैरवर्तन करुन तिच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तसेच याबाबत आई-वडिलांना सांगितले तर तुम्हाला चपलेने मारेन अशी धमकी फिर्यादी यांच्या मुलांना दिल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत.
Post Views: 77
Add Comment