देश / विदेश

ना सिक्योरिटी, ना ताफा; रुग्ण बनून सरकारी रुग्णालयात गेल्या IAS; समोर आलं धक्कादायक वास्तव

उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जेव्हा जिल्ह्यातील महिला एसडीएम (IAS) अचानक तपासणीसाठी आल्या तेव्हा खळबळ उडाली. IAS साध्या वेशात रुग्ण म्हणून तपासणीसाठी आल्या होत्या. सामान्य रुग्णांप्रमाणे त्या डॉक्टरांना भेटण्यासाठी रांगेत उभ्या राहिल्या. सुरुवातीला त्यांना कोणी ओळखू शकलं नाही. मात्र या IAS असल्याचं समोर आल्यानंतर तेथे उपस्थित कर्मचाऱ्यांना धक्काच बसला. आरोग्य केंद्रात त्यांना अनेक त्रुटी आढळल्या.
फिरोजाबादच्या IAS कृती राज यांनी मंगळवारी (१२ मार्च) तपासणी करण्यासाठी गुपचूप दीदामई येथील शकीला नईम आरोग्य केंद्र गाठलं. त्या त्यांची कार हॉस्पिटलपासून लांब उभी करून सर्वसामान्य रुग्णाप्रमाणे दाखल झाल्या. अशा स्थितीत त्यांना कोणीही ओळखू शकलं नाही. फिरोजाबादच्या आरोग्य विभागात अनियमितता, भ्रष्टाचार आणि वाईट वर्तनाच्या तक्रारी येत असल्याचे सांगण्यात येत आहे.
कृती राज यांच्याकडे ही तक्रार येताच त्यांनी तातडीने या प्रकरणाची दखल घेतली आणि अचानक पाहणी केली. दीदमई प्राथमिक आरोग्य केंद्रात कुत्रा चावल्यानंतर इंजेक्शन दिले जात नसल्याची तक्रार त्यांच्याकडे आली होती. तपासणीसाठी त्या प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचल्या तेव्हा गाडीतून खाली उतरताच त्यांनी ओढणीने चेहरा झाकून घेतला आणि सामान्य रुग्णाप्रमाणे लोकांशी चर्चा केली. औषधं तपासण्यासाठी त्या आत गेल्या असता एक्सपायरी डेट असलेली अनेक औषधं सापडली. डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची रुग्णांशी असलेली वागणूकही वाईट असल्याचं दिसून आलं. हॉस्पिटलमध्ये प्रचंड गोंधळ असल्याचं दिसून आले. याबाबत त्यांनी कठोर कारवाई करणार असल्याचं सांगितलं.
रुग्णालयातील कर्मचारी लोकांना उभं करून इंजेक्शन देत असल्याचं एसडीएम यांनी सांगितलं आहे. बेडवर खूप धूळ साचली होती. स्वच्छता नव्हती. डिलिव्हरी रूम आणि टॉयलेटमध्येही घाण आढळून आली. कर्मचाऱ्यांमध्ये सेवाभावचा अभाव होता. सध्या रिपोर्ट कारवाईसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येत आहे.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!