मेरे पिया गये रंगून
किया है वहॉसे टेलीफून
तुम्हारी याद सताती है
जिया मे आग लगाती है…
रूपेरी पडद्यावर हे गाणे तिला गाताना पाहून तिच्या तालावर न थिरकलेला जुन्या पिढीतील माणूस शोधूनही सापडणे कठीण. रसिकजनांची तर बातच न्यारी.
मुघल-ए-आझमची ‘बहार’ निगार सुलतानाने तिच्या पतीवर प्रेम आणि तिरस्कार दोन्ही सारख्याच उत्कटतेने केले आणि शेवटी के.आसिफला न्यायालयात सुध्दा खेचले.
१९४९ मध्ये आलेल्या ‘पतंगा’ चित्रपटातील ‘मेरे पिया गये रंगून’ हे गाणे तुम्हा सर्वांना आठवत असेल. होय, हे गाणे शमशाद बेगमने गायले होते, परंतु या गाण्याशी एक सेलिब्रिटी देखील जोडली गेली होती, जी तिच्या काळातील एक अतिशय सुंदर अभिनेत्री होती. मी बोलत आहे निगार सुलतानाबद्दल… जर तुम्ही अजूनही निगार सुलतानाला ओळखत नसाल तर मी तुम्हाला सांगतो की निगार ही तीच अभिनेत्री आहे जिने ‘मुघल-ए-आझम’ या ऐतिहासिक चित्रपटात ‘बहार’ची भूमिका साकारली होती.
‘तेरे कदमों पे सर अपना झुका कर हम भी देखेंगे’ ह्या गाण्यात मधुबाला सोबत जुगलबंदीच्या वेळी निगारने अभिनयातून व्यक्त केलेले भाव आजही आपल्या डोळ्यांसमोर दिसतात. आपल्या कौशल्याच्या माध्यमातून कलावंत वर्षानुवर्षे टिकून राहतो व तीच खऱ्या कलाकाराची ओळख असते. अशा कलाकारांमध्ये निगार सुलतानाचे नाव सन्मानाने घेतले गेल्यास नवल ते काय? निगार सुलतानाने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात लहान वयातच केली होती. पण जोपर्यंत तिचे वडील हयात होते, तोपर्यंत तिने अभिनयाचा विचारही केला नाही. शाळेत लहान-मोठ्या नाटकांत भाग घ्यायचा असला तरी अभिनयाला आपला व्यवसाय बनविण्याचे स्वप्नातही तिने पाहिले नव्हते.
●’निगार’ फिल्मी दुनियेचा एक भाग कसा बनली ? तर..निगार सुलतानाचा जन्म २१ जून १९३२ रोजी झाला. निगार सुलतानाचे वडील मूळचे हैदराबादचे असून ते सैनिक होते. वडील सैनिक असत्यामुळे तिला अशा वातावरणात वाढवले गेले, जिथे मुलांना फक्त निर्भयपणा शिकवला जातो. निगार सुलतानाही याच वातावरणात वाढली, त्यामुळे ती खूप निडर आणि धाडसी होती. पण धाडसी आणि बेधडक असण्यासोबतच ती अतिशय सुसंस्कृतही होती.
सुप्रसिद्ध लेखक राजकुमार केसवानी यांनी त्यांच्या ‘मुघल-ए-आझम’ या पुस्तकात या चित्रपटाच्या आणि चित्रपटाशी संबंधित कलाकारांच्या अनेक कथा त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर केल्या आहेत. या पुस्तकात राजकुमार केसवानी यांनी ‘बहार’ म्हणजेच ‘मुघल-ए-आझम’च्या निगार सुलतानाचाही अतिशय गंभीरपणे आणि तपशीलवार उल्लेख केला आहे.
● राजकुमार केसवानी निगार सुलतानाबद्दल लिहितात – निगार खूप लहान होती जेव्हा त्या काळातील प्रसिद्ध कलाकार जगदीप सेठी तिच्या वडिलांना भेटायला यायचे. दोघेही खूप चांगले मित्र होते. एके दिवशी अचानक निगारच्या वडिलांचे निधन झाले. आता सगळी जबाबदारी घरातल्या मोठ्या मुलीच्या खांद्यावर आली. जगदीश सेठी यांनी निगार यांना कुटुंबाची जबाबदारी घेण्याचा सल्ला दिला. निगारला एक भाऊ होता, जो तिचा सल्लागार आणि खूप चांगला मित्र होता. बराच विचारविनिमय केल्यानंतर भाऊ-बहिणीने फिल्मी दुनियेत येण्याचा निर्णय घेतला. यामध्ये सर्वात मोठे योगदान जगदीश सेठी यांचे आहे.
निगारचा चित्रपट प्रवास तिच्या वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी १९४६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रंगभूमी’ चित्रपटाने सुरू झाला. यानंतर तो टप्प्याटप्याने चित्रपटसृष्टीत उमेदवारी करता झाला. १९४८ मध्ये राज कपूरच्या ‘आग’ चित्रपटात नर्गिस आणि कामिनी कौशलसोबत निगार ही तिसरी अभिनेत्री होती. आता निगारचा चित्रपट प्रवास शिखरावर होता. यावेळी तिने प्रसिद्ध दिग्दर्शक एस.एम. युसूफशी लग्न केले. या दोघांनाही एक मुलगी होती, तिचे नाव हिना कौसर. जी नंतर तिच्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री बनली.
● युसूफ आणि निगारच्या लग्नाला काही वर्षेच झाली होती, तेव्हा प्रसिद्ध दिग्दर्शक के. आसिफने आपल्या ‘मुगल-ए-आझम’ या चित्रपटात निगारला बहारची भूमिका दिली होती. ही भूमिका मिळाल्याने निगार खूप खुश होती, पण युसूफ अजिबात खुश दिसत नव्हता. कारण त्याला के. आसिफचा रंगीबेरंगी स्वभाव चांगलाच माहीत होता. युसूफने निगारला चित्रपट न करण्यास सांगितले, पण निगारने त्याला होकार दिला नाही. यावरून दोन्ही पती-पत्नीमध्ये अनेकदा तणाव निर्माण झाला होता. बहारची व्यक्तिरेखा तिच्या करिअरला आणखी उंचीवर नेऊ शकते हे निगारला माहीत होतं. त्यामुळे ही व्यक्तिरेखा कोणत्याही परिस्थितीत साकार करण्याचे तिने ठरवले. पर्यायाने तिला युसुफ पासून विभक्त व्हावे लागले. निगारचे इरादे इतके मजबूत होते की युसूफसोबत तिचा घटस्फोटही तिला हे पात्र करण्यापासून रोखू शकला नाही.
आता ‘मुगल-ए-आझम’ चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले. निगार सेटवर बराच वेळ घालवायची. यावेळी तिला के.आसिफची कामाबद्दलची आवड आणि जिद्द अनुभवता यायला लागली होती. ती आसिफभोवती घिरट्या घालत राहिली. त्याचवेळी आसिफही निगारच्या सौंदर्याने आणि स्टाईलने आकर्षित झाला होता. दोन्हीकडे प्रेमाची आग इतकी भडकली होती की चित्रपटाचे शूटिंग संपण्यापूर्वीच दोघांनी लग्न केले. मात्र, निगारशी लग्न करताना तो आधीच विवाहित होता. त्याच्या पत्नीचे नाव सितारा. ती एक प्रसिद्ध नृत्यांगना देखील होती जिला आपण ‘सितारा देवी’ या नावाने ओळखतो. जिने ‘मुघल-ए-आझम’ चित्रपट बनवण्याचे आपल्या पतीचे स्वप्न साकार करण्यात महत्त्वाचे योगदान दिले होते.
● अखेर निगारने आसिफविरुद्ध गुन्हा दाखल केला कारण, ना त्याने सिताराला निगारशी लग्न करतो म्हणून सांगितले ना घटस्फोट मागितला. के.आसिफचा सुरुवातीपासूनंच स्वत:च्या जगण्याच्या पद्धतीवर विश्वास होता. पण त्याची कृती एक दिवस त्याच्यासाठी अडचणीची ठरेल हे त्याला माहीत नव्हते. त्याने सिताराला न सांगता निगारशी लग्न केले. त्याचप्रमाणे त्याने दिलीप कुमार यांची बहीण ‘अख्तर’ हिच्याशीही लग्न केले. मात्र हे घडताना पाहून गप्प बसणारी निगार, सितारासारखी नव्हती. निगार हे सुरुवातीपासूनंच निडर व्यक्तिमत्त्व होते. अख्तरसोबत लग्नाचा मुद्दा जोर धरू लागला तेव्हा के.आसिफने निगारला घटस्फोट दिला.
तरीही निगार गप्प बसली नाही. आसिफ दोषी असल्याच्या कारणावरून तिने न्यायालयात आसिफविरुद्ध खटला दाखल केला. निगारने असा युक्तिवाद केला होता की सितारा जिवंत असताना त्याने माझ्याशी लग्न केले आणि मी जिवंत असताना अख्तरशी लग्न केले. दोन्ही वेळी के.आसीफने कोणाचीही संमती घेतली नाही, जे बेकायदेशीर आणि शरियाच्या विरोधात आहे. हे प्रकरण बराच काळ न्यायालयात सुरू होते.
● इतकेच नाही तर आसिफचा मृत्यू झाला तेव्हा निगारला मालमत्तेत हिस्सा मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. तिने आपल्या आणि मुलांच्या हक्कांसाठी लढत अनेक कोर्टात केसेस दाखल केल्या. कायदेशीर अडचणी दरम्यान सुध्दा ती ७० च्या दशकापर्यंत चित्रपटांमध्ये काम करत राहिली आणि नंतर फर्निचरचे दुकान उघडले. आसिफ आणि निगारला दोन मुलं होती आणि निगारला हिना नावाची मुलगी तिच्या पहिल्या पतीपासून होती, जे सर्व तिच्यासोबतंच राहत होते. निगारला आपल्या तीन मुलांचे संगोपन करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला.
● अनेक हिन्दी चित्रपटांमध्ये तिने काम केले .आग, पतंगा, शीश महल, मिर्झा गालिब, याहुदी, दो कलियां, इत्यादी चित्रपटांमधून तिने अभिनय केला परंतु ‘मुघल-ए-आझम’ या ऐतिहासिक महाकाव्य ठरलेल्या चित्रपटात “बहार बेगम” ची भूमिका साकारण्यासाठी ती सर्वात उल्लेखनीय ठरली.
काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, निगार सुलतानाला आपल्या जीवनाच्या अखेरच्या काळात आर्थिक अडचणींचा सामना करत शेवटी फर्नीचर विकून परिवाराचा उदरनिर्वाह करावा लागला. मधुबाला, वैजयंतीमाला, वहिदा रहमान आणि समकालीन रूपवान अभिनेत्रींमधे काकणभर सरस ठरणाऱ्या निगार सुलतानाने २१ एप्रिल २००० रोजी मुंबईत अखेरचा श्वास घेतला.
आज भलेही ती आपल्यामधे देहरूपाने नसली तरी तिच्यासारखी रूपगर्विता ‘ बहार ‘ रूपेरी पडद्यावर पुन्हा बहरणे नाही.
आजही तिने साकारलेल्या पात्राच्या रूपाने निगार सुलतानाचा अभिनय तिच्या अस्तित्वाची साक्ष देत आम्हा रसिकांच्या हृदयसिंहासनावर विराजमान आहे.
— सच्चिदानंद काळे ✒️
धामणगाव (रेल्वे)
९८६०२३९२२३
Post Views: 63
Add Comment