नाशिक – (जनसूर्या मीडिया)
तीनपुतळा भागात बदनामी करीत असल्याच्या संशयातून दोघांनी एकास धारदार शस्त्राने भोसकल्याची घटना घडली. या घटनेत ३२ वर्षीय मजूर जखमी झाला असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भोला मंगेश बोरसे व त्याचा मित्र अशी मजूरावर धारदार शस्त्राने हल्ला करणा-या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी प्रविण शंकर पगारे (३२ रा.तीन पुतळयाजवळ,फुलेनगर) याने तक्रार दाखल केली आहे. पगारे मजूरी काम करतो. शनिवारी (दि.३) रात्री तो आपल्या घर परिसरातील बजरंग रसवंती समोर उभा असतांना दोघांनी त्यास गाठले.
यावेळी तू माझी विनाकारण बदनामी करतो अशी कुरापत काढून दुकलीने त्यास शिवीगाळ व दमदाटी केली. यावेळी संतप्त दोघांनी पगारे यास लाथाबुक्यांनी मारहाण करीत त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले. या घटनेत पगारे जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अधिक तपास पोलीस नाईक मोरे करीत आहेत.
Post Views: 55
Add Comment