अकोल्यातील पातूर शहरातील घटना ; आरोपी अटकेत
अकोला प्रतिनिधी –
बहिणीच्या रक्षणासाठी भाऊ कुठल्याही स्थरावर जायला मागे पुढे पाहत नसल्याचे आपण अनेकदा ऐकत, तसेच पाहत आलो आहे. मात्र अकोल्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एक तरुणाने आपल्या बहिणीला बारावीच्या परिक्षेत कॉपी पुरवण्यासाठी तोतया (नकली) पोलिसांचा बनाव केला आणि परीक्षा केंद्रावर पोहचला. मात्र त्याच्या एका चुकीमुळे पोलिसांनी त्याला पकडल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अकोल्यातील पातूर शहरातील शाहबाबू उर्दू हायस्कूलमध्ये बारावीची परीक्षा होणार होती. येथे एक तरुण परीक्षेदरम्यान पोलिसांचा गणवेश परिधान करून केंद्रावर पोहोचला. यावेळी वरिष्ठ अधिकारी परीक्षा केंद्रावर पोहोचल्यावर त्याने सॅल्यूट केलं. सॅल्यूट करण्याची पद्धत योग्य नसल्याने तो पकडला गेला.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, अटक करण्यात आलेल्या २४ वर्षीय आरोपीचे नाव अनुपम मदन खंदारे आहे. तो पांगरा बंदीचा रहिवासी आहे. त्याच्या बहिणीची परीक्षा पातूरच्या शाहबाबू हायस्कूलमध्ये होती. अनुपम खंदारे पोलिसांचा गणवेश परिधान करून या परीक्षा केंद्रावर पोहोचले. बहिणीला कॉपी देण्यासाठी आरोपी परीक्षा केंद्रावर फिरू लागला. त्यावेळी सुरक्षेसाठी पातूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किशोर शेळके हे त्यांच्या पथकासह परीक्षा केंद्रावर पोहोचले.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना पाहताच अनुपम यांनी त्यांना सॅल्यूट केला, मात्र त्यांची सॅल्युट पाहून पोलिसांना संशय आला.आरोपी तरुणाने घातलेल्या गणवेशावरील नेम प्लेटही चुकीची होती. हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी केली. यानंतर त्याच्याकडे चौकशी करून झडती घेतली असता त्याच्या खिशात इंग्रजी भाषेची प्रत सापडली. यानंतर पोलिसांनी त्याच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
Post Views: 84
Add Comment