संपादकीय –
पुढे होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपला पक्ष बळकट करणाचे काम सातत्याने सुरु असल्याचे धामणगाव मतदार संघात आपल्याला दिसत आहे. त्यासाठी आजी – माजी आमदाराकडून विविध कामाचे उदघाटन करून, कार्यक्रमाचे आयोजन करून मतदार संघात आपली पकड मजबूत असल्याचे दाखविल्या जात आहे. मागील काही महिन्यापासून धामणगाव मतदार संघात आजी – माजी आमदारांकडून अनेक स्पर्धा प्रतियोगिताचे आयोजन करण्यात आले, त्यामध्ये क्रिकेट, व्हॉलीबॉल, कब्बडी, भजन, रस्सीखेच स्पर्धेचा समावेश होता. मात्र या स्पर्धा प्रतियोगिता च्या शेवटी एक नवीन स्पर्धा चांगलीच रंगात आलेली असतानाचे चित्र मागील काही महिन्यापासून सातत्याने ती स्पर्धा सुरूच आहे ती म्हणजे कार्यकर्त्याची रस्सीखेच स्पर्धा.
कधी दादाच्या कार्यशैलीवर विश्वास ठेऊन कांग्रेस कार्यकर्त्याचा भाजप मध्ये प्रवेश तर कधी भाऊंच्या कार्यशैलीवर विश्वास ठेऊन भाजप कार्यकर्त्याचा काँग्रेस मध्ये प्रवेश, तर कधी काँग्रेस पक्षात प्रवेशाने भाजपाला झटका तर कधी भाजपात प्रवेशाने काँग्रेस ला झटका असे सातत्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून धामणगाव मतदार संघात घडत असल्याचे चित्र पाहावयाला मिळत आहे. त्यामुळे आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धा प्रतियोगिता खरंच सर्वसामान्यांसाठी आहे कि, आपले राजकीय वर्चस्व दाखविण्यासाठी हा प्रश्न याठिकाणी सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे आपली राजकीय पोळी शेकण्यासाठी या विविध प्रतियोगितेचे आयोजन करण्यात येत असल्याची खमंग चर्चा धामणगाव मतदार संघात सुरु आहे.
कार्यकर्त्याच्या रस्सीखेच मध्ये शेतकऱ्यांसह सर्वसामान्याकडे मात्र दुर्लक्ष ?
एकीकडे धामणगाव मतदार संघात पक्ष वाढीसाठी नवनवीन फंडे, कार्यकर्त्याची ओढाताणीचे स्पर्धा सुरु असताना दुसरीकडे मात्र शेतकरी, सर्व सामान्यकडे आजी माजी आमदाराचे दुर्लक्ष होत असल्याचे जनसामान्यांत बोलल्या जात आहे, मागच्या वर्षी १२ हजारावरील कापूस आज ६ ते ७ हजाराच्या घरात विकावा लागत आहे, दैनंदिन वापरापासून तर अनेक गोष्टींमध्ये प्रचंड भाववाढ होऊन ती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेली असताना देखील त्यासंदर्भात कुणीच आवाज काढत नसल्याची चर्चा हि सातत्याने सुरु आहे. तर नेहमीप्रमाणे जगाचा पोशिंदा म्हटला जाणारा शेतकरी आज सुद्धा फक्त मतदानापुरता वापरल्या जात आहे. निवडणूक आल्या कि, शेतकरी दिसतो निवडणूक गेली कि, शेतकरीसुद्धा दूर दूर पर्यंत या राजकीय पुढार्यांना दिसून पडत नाही, त्याचे दुःख, वेदना याच्याशी काहीही घेणं देणं नसल्यागत वावरल्या जाते.
Add Comment