छत्रपती संभाजीनगर :
मागील काही दिवसांपासून आपल्या प्रलंबित मागण्यासाठी राज्यभरात आशा स्वयंसेविकांकडून संपाची हाक देण्यात आली आहे. अशात वारंवार विनंती करूनही संपावरील आशा स्वयंसेविका कामावर रुजू झाल्या नसल्याने छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त जी. श्रीकांत यांनी ४५० आशा स्वयंसेविकांना निलंबित केले होते. मात्र, आता आशा स्वयंसेविका शनिवारी माफीनाम्यासह प्रशासक जी. श्रीकांत यांची भेट घेऊन कामावर हजर राहण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, आयुक्तांनी माफीनामा अमान्य करीत नवीन भरती प्रक्रिया सुरू करण्याचा इशारा दिला असून, संपावर गेलेल्या ४५० आशा स्वयंसेविकांच्या निलंबनावर ठाम असल्याची भूमिका घेतली आहे.
मानधन वाढीसह आपल्या प्रलंबित विविध मागण्यांसाठी आशा स्वयंसेवी संघटनेने राज्यव्यापी संपाची हाक दिली होती. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अशा सेविका देखील या संपात सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. याच संपात छत्रपती संभाजीनगर महापालिकेत कार्यरत असलेल्या ५११ आशा स्वयंसेविकाही सहभागी झाल्या होत्या. मात्र, याच संपाचे परिणाम आरोग्य विभागावर होतांना पाहायला मिळत असून, अशा सेविकांनी तात्काळ कामावर हजर राहण्याबाबत दोन वेळेस आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अशा सेविकांना नोटिसा बजावल्या होत्या. मात्र, आपल्या मागण्यांवर ठाम असलेल्या अशा सेविकांनी या नोटीसची कोणतेही दखल घेतली नव्हती. त्यामुळे मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी ४५० आशा स्वयंसेविकांना निलंबित करण्याचे आदेश दिले होते.
नवीन भरती प्रक्रिया सुरू करण्याचा इशारा
आशा स्वयंसेविकांकडून पुकारण्यात आलेल्या संपाचे परिणाम आरोग्य विभागावर होत असल्याने, मनपा प्रशासनाने दोन वेळा नोटीस काढून त्यांना कामावर हजर राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, तरीही ४५० आशा स्वयंसेविका कामावर हजर न राहिल्याने आयुक्तांनी त्यांना निलंबित करण्याचे आदेश काढले होते. दरम्यान, शनिवारी आशा स्वयंसेविकांनी प्रशासक जी. श्रीकांत यांची भेट घेतली. सोबतच माफीनामा लिहून देत कामावर हजर राहण्याची भूमिका मांडली. मात्र, आयुक्तांनी माफीनामा अमान्य करीत नवीन भरती प्रक्रिया सुरू करण्याचा इशारा दिला असून, संपावर गेलेल्या ४५० आशा स्वयंसेविकांच्या निलंबनावर ठाम असल्याची भूमिका घेतली आहे.
प्रशासकांनी आशांच्या शिष्टमंडळाला फैलावर घेतले.
निलंबन मागे घेण्याच्या मागणीसाठी आलेल्या आशांच्या शिष्टमंडळाला प्रशासकांनी फैलावर घेतल्याचे पाहायला मिळाले. वारंवार तुम्हाला संधी देऊन देखील तुम्ही रुजू झाल्या नाहीत. स्वतःला सर्वसामान्य समजता, पण तुमच्याकडे कामेही सर्वसामान्य नागरिकांचीच होती. तुमच्या संपामुळे त्यांची किती अडचण झाली? याची तुम्हाला जाणीव आहे का? काम न करता तुम्हाला पगार देण्यासाठी शासनाने माझी नियुक्ती केलेली नाही, असे आयुक्त म्हणाले.
Post Views: 81
Add Comment